महिला मतदारांचा कल कुणाकडे ?

महिला मतदारांचा कल कुणाकडे ?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने देशभरात प्रचाराची धामधूम सुरू आहे. लोकशाहीच्या या उत्सवात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वाढती महागाई, महिला सुरक्षा, कौटुंबिक हिंसाचार, बेरोजगारी हे महिलांचे प्रश्न कायम आहे. महिला आरक्षणाचे विधेयक पारित झाले, मात्र महिला खऱ्या अर्थाने सक्षम कशा होणार, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे यंदा महिलांचा कौल कोणाला असणार, यावर उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात एकूण ४५ लाखांहून अधिक महिला मतदारांची संख्या आहे. नोकरदार महिलांपासून, मनोरंजनापासून ते व्यवसायातही महिला पुढे आहेत. तर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटी- मोठी काम करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचा कल महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांचे प्रश्न प्रामुख्याने घेतले आहे.
अलीकडे उमेदवाराच्या विजय, पराभवात महिलांचे मत निर्णायक ठरत आहेत. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांना महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी विचारात घ्याव्या लागतात. मात्र, महिलांची एवढी संख्या असूनही मतांसाठी त्यांचा वापर केला जातो, असा सूरही महिलांमधून उमटत आहे. महिला विकासासंदर्भातील दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर त्याची पूर्तता होताना दिसत नाही. त्यामुळे महिलांबद्दल कितीही घोषणा झाल्या तरी महिलांचे मूळ प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. केवळ हळदी-कुंकू आणि पैठणीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण होण्याची गरज आहे, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
--
महिलांचे मुख्य प्रश्न
- वाढती महागाई
- सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता
- आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न
- सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव
- सुरक्षित प्रवास
- कौटुंबिक हिंसाचार
- कार्यालयीन ठिकाणी लैंगिक भेदभाव, असमानता
….
राजकीय पक्षांकडून अपेक्षा
- महिलांना सन्मान आणि संरक्षणाची हमी
- नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवे
- महिलांसाठी आरोग्य सुविधा
- कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना कायदेशीर संरक्षण
- गॅस सिलिंडरचे दर कमी करा
- लोकलमध्ये महिला डब्यांची संख्या वाढवणे
…..
ज्येष्ठ नागरिकांना सोसायटीच्या कामात अनेक अडचणी येतात. विशेषतः वृद्ध महिलांना त्याचा जास्त त्रास होतो. महिला ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे.
- वसंतसेना श्रीनिवासन, ज्येष्ठ नागरिक
--….
युवक, महिलांची क्षमता असूनही त्यांना रोजगार मिळत नाही. दुसरीकडे खासगीकरण वाढले आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रश्नावरून मतदान करेल.
- नम्रता गवळे, गृहिणी
--
गॅस, भाजीपाला, प्रवास खर्च सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे गृहिणींसाठी घर चालवणे ही तारेवरची कसरत झाली आहे.
- जयश्री येवले, गृहिणी
---
निवडणुका लागल्या की हळदी-कुंकू आणि पैठणीचे कार्यक्रम घेण्यापेक्षा महिलांना नोकरी किंवा व्यवसाय उभारण्यात मदत करा. जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
- विद्या मुंडे, नोकरदार
---
विद्यार्थी, तरुणांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक योजना तळागाळपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच निवडणुकाही पारदर्शक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे.
- देवयानी वाकचौरे, नवमतदार
.....
मुंबई उपनगर (चार लोकसभा मतदारसंघ)
एकूण महिला मतदार - ३४,२६,२८९
सर्वाधिक महिला मतदार असलेले विधानसभा 
दिंडोशी - १,८३,७०६
मालाड पश्चिम - १,५६,३३६
बोरिवली - १,५५,५९०
गोरेगाव - १,४४,१६०
मुलुंड - १,४२,४००
---
मुंबई शहर (दोन मतदारसंघ)
एकूण महिला मतदार - ११,२४,०८४
मलबार हिल -१,२२,००८
शिवडी - १,२१,९०३
वरळी - १,१५,८६९
भायखळा - १,१५,७७९
माहीम- १,०९,८७३
...

भाजपचा महिला जाहीरनामा  
- तीन कोटी लखपती दीदी 
- महिला बचत गटांना सेवा क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवणार 
- महिला बचतगटाचे उत्पादनाला बाजारपेठ
- नोकरदार महिलांच्या सुविधा वाढविणार 
- क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणार
- महिलांसाठी आरोग्य अभियान
- महिला आरक्षण लागू करणार
----..
काँग्रेसचा महिला जाहीरनामा
- कार्यालयात लैंगिक भेदभाव कमी करणे
- महिलांना समान, काम समान वेतन 
- अंगणवाडी सेविका, मदतनीसांची संख्या दुप्पट करणार
-  महिला, बालकांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी करणार 
- केंद्रीय सशस्त्र दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com