आधीच पाणीटंचाई, त्‍यात वीजपुरवठ्याचे ग्रहण

आधीच पाणीटंचाई, त्‍यात वीजपुरवठ्याचे ग्रहण

नेरळ, ता. २५ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत बहुतांश गाव-पाड्यांत कामे झाली आहेत. मात्र ज्‍या जलस्रोत्रांवर योजना राबवण्यात आल्‍या आहेत, त्‍यातील बहुतांश आटले आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीतील चित्र काहीसे वेगळे आहे. येथील विठ्ठलवाडीत पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरीत मुबलक पाणी आहे, मात्र वीजप्रवाह सतत कमी जास्‍त होत असल्‍याने टाकीत पाणीच चढत नाही. परिणामी महिलांना भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
कर्जत तालुका आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. अनेक वाड्या वस्‍त्‍यांमध्ये जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. प्रशासनाकडून दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून टँकरची व्यवस्‍था केली जाते, मात्र एक-दोन टँकर किती गाव-पाड्यांची तहान भागवणार, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो.
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीत ७० घरांची लोकवस्ती असलेल्या विठ्ठलवाडीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करण्यात आले होती. नांदगाव खुर्द अशी योजना असून यात विठ्ठलवाडी व डामसेवाडीचा समावेश आहे. एकूण ७२ लाखांची योजना याठिकाणी राबवण्यात आली असून पाणी साठवण्यासाठी दोन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तर विठ्ठलवाडीमध्ये डोंगराखाली असलेल्‍या भुताची जाळ येथील विहिरीतून पाणी आणले जाते. विहिरीला मुबलक पाणीही आहे. मात्र वारंवार खंडित होणे, प्रवाह कमी-जास्‍त होत असल्‍याने विठ्ठलवाडीतील साठवण टाकीत पाणी पोहोचतच नाही. त्‍यामुळे ग्रामस्‍थांना पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते. वाडीजवळ असलेल्‍या एका खासगी फार्ममधून ग्रामस्‍थ, लहान मुले दिवसभर पाणी भरताना दिसतात.
गावात जलजीवन योजनेंतर्गत काम झाले, पाणी साठवण टाकीही बांधली, मात्र जलवाहिनी भूमिगत न टाकता, वरच्यावर टाकल्‍याने तिला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्‍यामुळे आम्‍हाला नक्‍की पाणी मिळणार का, असा प्रश्‍न ग्रामस्‍थांकडून विचारण्यात येत आहे.

जलजीवन योजनेचे काम अजून शिल्लक आहे. जलवाहिनी वरच्या वर टाकल्‍याची ग्रामस्थांची तक्रार असे, तर ती खोदून पुन्हा टाकण्यात येईल. तसेच वीजप्रवाह कमी जास्‍त होत असल्याने पाणी टाकीपर्यंत पोहचत नसल्‍याने आवश्‍यक उपाययोजनांबाबत वीज महावितरणशी चर्चा करण्यात येईल.
- अनिल मेटकरी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, कर्जत

वाडीत पाण्याची टाकी बांधली, घरात नळही आले, मात्र टाकीत पाणीच नसेल तर ग्रामस्थांना कुठून मिळणार, जलवाहिनी टाकताना ठेकेदाराने ढिसाळ कारभार केल्याने अनेक ठिकाणी ती फुटली आहे. त्यामुळे कधी टाकीतून पाणी सोडलेच तरी गळतीमुळे वाहून जाते. घरापर्यंत पोहोचत नाही. त्‍यामुळे वाडीत नव्याने जलवाहिनी टाकावी
- काशिनाथ गोसावी, ग्रामस्थ, विठ्ठलवाडी

उन्हातान्हात महिला-मुलांना पाण्यासाठी दीड-दोन किलोमीटर वणवण फिरावे लागते. गावात पाण्याची साठवण टाकी नावाला आहे. तिथपर्यंत पाणीच येत नसल्‍याने घरात पाणी येण्याचा प्रश्‍नच नाही. त्‍यामुळे लाखो रुपये खर्चूनही ग्रामस्‍थांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. वाडीतील लहान मुले, महिलांचा दिवस पाणी भरण्यात जातो, याबाबत ठेकेदार, संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्‍यास टाळाटाळ करतात.
- शैला रमेश मुकणे, महिला ग्रामस्थ, विठ्ठलवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com