मुंबईत उमेदवाराशिवाय प्रचार सुरू

मुंबईत उमेदवाराशिवाय प्रचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शहर आणि उपनगरातील सहा लोकसभा मतदारसंघाची लढत शेवटच्या टप्प्यांत म्हणजे २० मे रोजी होणार आहे. त्यासाठी ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघातील लढतीचे चित्र आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. उर्वरित चार ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) अजूनही चांगल्या उमेदवारांच्या शोधात आहे. तसेच काही मतदारसंघावर अजूनही वाटाघाटी सुरू असून तेथे उमेदवारांशिवाय प्रचार सुरू असल्याचे चित्र आहे. मुंबईतील राजकीय परिस्थितीचा घेतलेला आढावा…

१. दक्षिण मुंबई
विद्यमान खासदार- अरविंद सावंत (शिवसेना)
लढतीचे चित्र
शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत
महायुती- नावावर एकमत नाही.
दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने महिनाभरापूर्वी अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारांच्या नावाचा घोळ अजूनही सुरू आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांचा प्रचार जोरात सुरू आहे. विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यासोबत महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय सुरू आहे. महायुतीत शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. तसेच मिलिंद देवरा हे अजूनही प्रयत्नशील आहेत; मात्र अजूनही उमेदवार निश्‍चित झालेला नाही.

...
२. दक्षिण मध्य मुंबई
विद्यमान खासदार- राहुल शेवाळे (शिवसेना)
लढतीचे चित्र
शिवसेना (ठाकरे गट) - अनिल देसाई
शिवसेना (शिंदे गट) - राहुल शेवाळे
दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातून दोन शिवसेना गटांत लढाई होत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई रिंगणात आहेत. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असून आजी-माजी सहकारी आहेत. शेवाळे यांनी विभागावर प्रत्येक समाजाशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. अनिल देसाई यांनी थेट प्रचार सुरू केला नसला तरी कार्यकर्ता मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे. दोन्ही उमेदवार घटक पक्षासोबत समन्वयाने काम करत असल्याचे चित्र आहे. तसेच येथे उद्धव ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतली आहे.
…..
३. उत्तर पूर्व मुंबई
विद्यमान खासदार- मनोज कोटक (भाजप)
लढतीचे चित्र-
भाजप - मिहीर कोटेचा
शिवसेना (ठाकरे गट)- संजय दिना पाटील
उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. येथून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संजय दिना पाटील यांनी मतदार जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. दिवसा कार्यकर्ता मेळावा तर रात्री मतदारसंघ पिंजून काढण्यावर त्यांनी भर दिला आहे. मिहीर कोटेचा यांनीही आपली प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. तसेच त्यांनी मतदारांच्या भेटीवर भर दिला आहे.
….

४. उत्तर मुंबई
विद्यमान खासदार- गोपाळ शेट्टी (भाजप)
लढतीचे चित्र
भाजप - पियूष गोयल
आघाडी - उमेदवार ठरला नाही.
भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपने पियूष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यानुसार त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे; मात्र महाविकास आघाडीत या मतदारसंघावरून घोळ सुरू आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असला तरी काँग्रेसला अजूनही तगडा उमेदवार मिळाला नाही.
…..
५. मुंबई उत्तर मध्य
विद्यमान खासदार- पूनम महाजन (भाजप)
लढतीचे चित्र-
भाजप - उमेदवारावर एकमत नाही
आघाडी - उमेदवार ठरला नाही
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजपमध्ये आशिष शेलार आणि पराग अळवणी यांच्या नावाचावर विचार सुरू आहे. मात्र, शेलार लढण्यासाठी इच्छुक नाही. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नसीम खान आणि राज बब्बर यांची नावे आहेत. तर वर्षा गायकवाडही इच्छुक असल्याचे कळते.
……..
६. उत्तर पश्चिम मुंबई
विद्यमान खासदार- गजानन कीर्तिकर, शिवसेना
लढतीचे चित्र-
भाजप - उमेदवार ठरला नाही
आघाडी - अमोल कीर्तिकर (ठाकरे गट)
उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. ईडीच्या चौकशीला तोंड देत त्यांचा प्रचार सुरू आहे. येथे महायुतीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. येथून महायुतीकडून भाजप उमेदवार उतरण्याची शक्यता आहे. उमेदवार घोषित झाला नाही तरी भाजपची प्रचारयंत्रणा सक्रिय झाली आहे.
......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com