ठाण्याच्या पीचवर सध्या एकच खेळाडू

ठाण्याच्या पीचवर सध्या एकच खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यासह भरण्यास शुक्रवार (ता. २६)पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. मात्र, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या महासंग्रामात महाविकास आघाडीने विद्यमान खासदारांनाच संधी दिल्याने सध्या एकच ‘खेळाडू’ पिचवर उतरला आहे. दुसरीकडे आपल्याला धावपट्टीवर खेळता येईल, या आशेने विभागीय मेळावे, बैठकांची ‘नेट प्रॅक्टीस’ करणारा महायुतीचा नेमका कोणता खेळाडू मैदानात उतरणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्याआधीच उमेदवाराची उत्सुकता वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज वितरित करण्यापासून ते भरण्यापर्यंतची प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू होत आहे. या प्रक्रियेसाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. असे असले तरी अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवार (ता. २९)पासूनच जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या भिवंडी या एकमेव लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीचे भाजप उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे हेसुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. पण पाटील यांचा विजयाचा रथ रोखण्यासाठी प्रसंगी माघार घेत महाविकास आघाडीला मदत करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. पण असे असले तरी भिवंडीची लढत महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशीच होणार हे निश्चित आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने विद्यमान खासदार राजन विचारे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कट्टर समर्थक असलेले विचारे सध्या एकमेव उमेदवार या मतदारसंघात आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून दोन महिन्यांपासून उमेदवारांच्या नावांची केवळ चर्चाच सुरू आहे. वास्तविक उमेदवार कोणाचाही असला तरी नरेंद्र मोदी यांचाच चेहरा मानून आणि नमो सैनिक म्हणून काम करण्याची तयारी येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महामेळाव्यात दर्शवली होती. पण, जागा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर हे सुद्धा इच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा जोर वाढवला होता. दुसरीकडे शिंदे गटाचे इच्छुक माजी महापौर नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांनी विभागीय मेळाव्यांचा धडाका लावला होता.


दोन शिवसेना एकमेकांसमोर भिडणार?
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संधी दिली आहे. त्यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी शिंदे गटाने अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे कल्याणमध्येही महाविकासविरोधात महायुती अशी थेट लढत होणार असली, तरी खरी लढाई ही दोन शिवसेनेमध्ये असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातही दोन शिवसेना एकमेकांसमोर भिडणार असल्याचे दिसते. पण अजूनही त्याबाबत कोणतीच स्पष्टता आलेली नाही. या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला होता; पण ही जागा शिंदे गटालाच मिळणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही उमेदवार ठरलेला नाही.

नावांची पतंगबाजी
महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यांपासून डझनभर इच्छुकांच्या नावांची नुसतीच पतंगबाजी झाली. यामध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींपासून ते पत्रकारांच्या नावांचा धागा जोडला गेला. आधी पाडव्यानंतर चैत्र नवरात्रोत्सव, त्यानंतर दोन दिवस असे म्हणत आठवडा उलटला तरी उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. आतातर अर्ज भरण्याची मुदत जवळ आली, तरी नावांच्या पतंगबाजीत कोणाची डोर कापली जाणार याचे केवळ तर्कवितर्कच काढले जात आहेत.

मेळाव्यांना ब्रेक
उमेदवारी मिळेल या आशेने शिंदे गटाच्या इच्छुकांनी सुरुवातीला धडाक्यात महामेळावे, विभागीय मेळावे घेतले. वागळे इस्टेट, वर्तकनगर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आदी ठिकाणी इच्छुकांनी मेळावे घेत शक्तिप्रदर्शन केले. त्यात शेवटच्या टप्प्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही सखी महोत्सव आयोजित करून स्त्री शक्तीचा परिचय करून दिला. पण आता नाव जाहीर होईपर्यंत हे मेळावे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com