रोडपालीत धुळीचा लोटमुळे रहिवासी हैराण

रोडपालीत धुळीचा लोटमुळे रहिवासी हैराण

रोडपालीत धुळीच्या लोटमुळे रहिवासी हैराण
गृहनिर्माण प्रकल्‍पात धूळप्रतिबंधक नियम धाब्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : रोडपाली वसाहतीमध्ये इमारत बांधकामात धूळप्रतिबंधक उपाययोजना न करता शक्तिशाली यंत्रांच्या साहाय्याने तोडकाम व खोदकाम सुरू असल्याने परिसरात माती व धुरांचे लोट पसरले आहेत. यामुळे परिसरातील रहिवासी धुळीने हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, येथील रहिवाशांच्या घरातील साहित्‍य धुळीने माखत असल्‍याचे दिसून येत आहे. याप्रकरणी महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने हवेतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना राज्‍यातील महापालिकांना देण्यात आल्‍या आहेत.‍ गेल्या वर्षापासून पनवेल महापालिका नगररचना उपसंचालक ज्योती कवाडे यांनी धूळप्रतिबंधक उपाययोजना न करता इमारत तोडणाऱ्या, धुळीचे प्रदूषण करणाऱ्या शंभर विकसक व ठेकेदारांना नोटिसा दिल्या होत्या; परंतु विकसकांनी पालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. येथीन इमारतीचे तोडकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने इमारतीच्या चारही बाजूला २५ फूट उंचीचे पत्रे तसेच हिरव्या जाळ्या लावणे, पाडकाम करण्यापूर्वी आणि करताना इमारतीवर टँकरद्वारे पाण्याचे फवारे मारणे आदी कामे संबंधित ठेकेदाराने करणे आवश्यक असते. मात्र, पनवेलमध्ये सध्या बहुतेक विकसकांकडून धूळ नियंत्रणाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्‍याचे दिसून येत आहे. याचाच फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. रोडपालीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर निर्माणधीन गृहप्रकल्‍पाची कामे सुरू असून सर्वत्र धुळीचे लोट पसरले आहेत. रहिवाशांच्‍या घरामध्येदेखील अनेक साहित्‍यांवर धूळ बसत असल्‍याने संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे. या धुळीमुळे श्‍वसनाचे विकार जडण्याची भीती रोडपालीवासीयांना वाटू लागली आहे. येथील बांधकाम ठेकेदार धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने नेमून दिलेल्‍या अटीला केराची टोपली दाखवत असल्‍याचे येथील रहिवाशांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे धूळप्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याशिवाय ठेकेदाराला इमारत बांधकाम तोडण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
.............................
बांधकामाचे नियम पाळण्यासंदर्भात विकसकांना नोटीस पाठवून वारंवार सूचना दिल्या गेल्या आहेत. यासंदर्भात बांधकाम विकसकांना पुन्हा नोटीस काढली जाईल.
-विठ्ठल धायगुडे, अभियंता, नगररचना विभाग, पनवेल महापालिका
.........................
रोडपाली परिसरात बांधकाम विकसकांची मनमानी सुरू आहे. पालिकेचा बांधकाम विकसकांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उग्र वासाने रोडपालीचे नागरिक आधीच त्रस्त असताना आता धुळीची त्‍याच भर पडली आहे.
-अमर ठाकूर, स्‍थानिक रहिवासी, रोडपाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com