पालघरमध्ये महिला, तरुण, दिव्यांगराज

पालघरमध्ये महिला, तरुण, दिव्यांगराज

वसई, ता. २५ (बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या २० मे रोजी होणार आहे. याची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक आयोगाकडून केली जात आहे. मतदान साहित्याची जमवाजमव, मतदार केंद्राची व्यवस्था यांसह पोलिसही सज्ज झाले आहेत. मतदान केंद्रांवर यंदा वेगळेच चित्र दिसणार आहे. पूर्वी केंद्रांवर सरसकट कर्मचारी, अधिकारी दिसायचे; मात्र येणाऱ्या मतदानाच्या वेळी महिला, तरुण व दिव्यांग हे एकूण १८ मतदान केंद्रांवर पहारा देणार आहेत. त्यामुळे ही अनोखी संकल्पना आगळीवेगळी ठरणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने, लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी महिला नियंत्रित मतदान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येत असून, यासोबत पालघरमध्ये तरुण, दिव्यांगांनाही समाविष्ट पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई, नालासोपारा आणि वसई या सहा विधानसभेत एकूण १८ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यात सहा विधानसभेत महिला, तरुण व दिव्यांग नियंत्रित केंद्र असणार आहेत. या केंद्रांवर कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षकांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. येत्या २० मे रोजी मतदान पार पडणार आहे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा वेळोवेळी घेत असून त्यात नव्या संकल्पना मांडत आहेत. अशा अनोख्या संकल्पनेमुळे मतदान केंद्रात उल्हासित वातावरण निर्माण होणार, असे चित्र सध्याचे आहे.
-------------------------
निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा
येत्या २० मे रोजी मतदान केले जाणार आहे. अद्याप काही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले नाहीत. त्यातच आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर ६ मे रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी आहे. मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
---------------
पालघर मतदानसंघात महिला, तरुण व दिव्यांग असे स्वतंत्र मतदान नियंत्रित केंद्र असणार आहेत. या ठिकाणी सहा विधानसभेतील केंद्र ठरवण्यात येणार आहेत. ज्यात स्वतंत्र महिला, तरुण व दिव्यांग अशी केंद्रे असणार आहेत.
- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर
----------------------
मतदार - २१ लाख २६ हजार
मतदान केंद्र - २ हजार २६३
शाईच्या बाटल्या - ५ हजार
कर्मचारी - १४ हजार
महिला नियंत्रित केंद्रे - ६
तरुण नियंत्रित केंद्र - ६
दिव्यांग नियंत्रित केंद्र - ६
-------------------
मतदारांचा प्रतिसाद लाभणार
वेगळी संकल्पना पहिल्यांदाच पालघर लोकसभा मतदारसंघात राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदारांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळेल, अशी आशा निवडणूक विभागाला आहे. मतदान करण्यासाठी विविध मार्गाने जनजागृती केली जात असताना नियंत्रित केंद्रांवर तरुण, दिव्यांग आणि महिला राज महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com