पार्किंगची सर्व माहिती करारात देणे बंधनकारक

पार्किंगची सर्व माहिती करारात देणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : नव्या गृहप्रकल्पातील पार्किंग विकताना विकसकाने त्याची लांबी, रुंदी, उंची, जागा किती आहे, अशा प्रकारची सर्व माहिती खरेदी-विक्री करारात देणे महारेराने बंधनकारक केले आहे. त्यामुळे खरेदीदाराची फसवणूक होणार नाही. तसेच भविष्यात पार्किंगवरून होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे.
विकसकांकडून खरेदी केलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंगमध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही, पार्किंग लहान असल्याने धड गाडी लावता येत नाही. कशीबशी गाडी पार्क केली तर गाडीचा दरवाजा उघडणे कठीण होते. याबाबतच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस महारेराकडे वाढत आहेत. त्याची रेरा प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. घर खरेदीदारांना भविष्यात अशा समस्यांना सामोरे जायला लागू नये, यासाठी सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या नियतवाटप पत्रात आणि केल्या जाणाऱ्या खरेदी-विक्री करारांमध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले पत्र जोडणे बंधनकारक केलेले आहे. या जोडपत्रात जेथे पार्किंग दिले जाणार आहे, तेथील क्रमांक, पार्किंगचा आकार, उंची, रुंदी, पार्किंगचे इमारतीतील ठिकाण याबाबतच्या सर्व तपशिलाचा उल्लेख करावा लागणार आहे. यात कुठल्याही त्रुटी राहू नये, यासाठी महारेराने या जोडपत्राचा आदर्श मसुदाही जारी केला आहे. यामुळे नवीन घरात गेल्यानंतर घर खरेदीदारांना पार्किंगबाबत जो मनस्ताप सहन करावा लागतो, तो टळणार आहे.
….
खुल्या पार्किंगसाठी पैसे आकारणे गैर
विकसक अनेक ठिकाणी खुल्या पार्किंगसाठी पैसे आकारत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याची दखल घेत महारेराने जुलै २०२१च्या परिपत्रक क्रमांक ३६ अन्वये पार्किंगच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. यात खुला पार्किंग एरिया हा चटई क्षेत्रात मोजल्या जात नसल्यामुळे त्यासाठी विकसक पैसे आकारू शकत नाही, हे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे विकसकाने जर अशाप्रकारे पैसे आकारल्यास ते बेकायदेशीर ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com