नेरुळमध्ये पाच फ्लेमिंगोंचा मृत्यू

नेरुळमध्ये पाच फ्लेमिंगोंचा मृत्यू

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : नेरूळ सीवूड्स येथील डीपीएस तलावाजवळ पाच फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे, तर सात फ्लेमिंगो जखमी झाल्याचे गुरुवारी (ता. २५) पहाटे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच चार फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता. फ्लेमिंगोंच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नॅटकनेक्ट फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

नेरूळ आणि सीवूड्स भागातील नागरिक गुरुवारी पहाटे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना काही फ्लेमिंगो मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. नागरिकांनी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे (डब्ल्यूडबल्यूए) बचावकर्ता सनप्रीत सावर्डेकर यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली. त्यानंतर सावर्डेकर यांच्या पथकाने घटनास्थळी येत जखमी फ्लेमिंगोंना मानपाडा येथील रुग्णालयात दाखल केले; तर मरण पावलेल्या पाच फ्लेमिंगोंना वनविभागाने ताब्यात घेऊन मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

सीवूड्स येथील डीपीएस शाळेलगतच्या फ्लेमिंगो लेक येथील पाण्याचा प्रवेश अवरोधित केल्यामुळे तेथील जमीन कोरडी राहत आहे. तसेच नेरूळ जेट्टीच्या रस्त्याखाली तलावाच्या दक्षिणेकडील एक भाग गाडला गेल्याने येथील पाणथळ जागा पुन्हा पूर्ववत करणे आवश्यक आहे. ‘सेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरम’च्या रेखा सांखला यांनीही तलावातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्याची विनंती महापालिका आणि सिडकोकडे केली आहे. डीपीएस फ्लेमिंगो सरोवरात अन्न न मिळाल्याने आणि उडणाऱ्या हेल्टर-स्केल्टरमुळे पक्षी विचलित होत असावेत, असा पक्षीप्रेमींचा अंदाज आहे.
--
प्रकरणाचा अभ्यास होणार
नेरूळ व सीवूड्स परिसरामध्ये आठवडाभरात ८ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी १४१ वर्षे जुन्या असलेल्या बीएनएचएस या संशोधन संस्थेकडे हा मुद्दा लावून धरला आहे. तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य मॅन्ग्रोव्ह सेल यांनादेखील याबाबत सतर्क केले आहे. दरम्यान, फ्लेल्मिंगोंच्या मृत्यू प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com