मतदारांनो, ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’

मतदारांनो, ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २९ : महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त महापालिकेने १ ते ३ मेपर्यंत मतदारांमध्ये मतदान जागृतीसाठी ‘चला पुस्तकांशी दोस्ती करूया’ या संकल्पनेवर भव्य पुस्तक प्रदर्शनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम उल्हासनगरातील सिंधू भवन सभागृहात राबवण्यात येणार आहे. पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वाचकांना या वेळी १० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच, ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल, त्यांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण २० टक्के सवलतीवर पुस्तक खरेदी करता येणार आहे.

आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची ही संकल्पना आहे. मतदान जागृती करण्यासाठी त्यांनी ‘चला पुस्तकांशी दोस्ती करूया’ हा उपक्रम उल्हासनगरातील सिंधू भवन सभागृहात तीन दिवस राबवणार आहे. या प्रदर्शनावेळी उपायुक्त मुख्यालय किशोर गवस, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनात ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल, त्यांना ते मिळवण्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. त्यासाठी विशेष कक्ष प्रदर्शनात उभारला जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून मतदान ओळखपत्राची प्रक्रिया सुरू केल्यास त्या वाचकालाही अतिरिक्त १० टक्के सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे.

वाचकांकडून प्रतिज्ञा
पुस्तक प्रदर्शनादरम्यान मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे. त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
महापालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांत शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांत ज्या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळवले आहे, अशा विद्यार्थ्यांना; तसेच त्यांना विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार पुस्तक प्रदर्शनादरम्यान करण्यात येणार आहे. त्यासोबतच उल्हासनगरातील अभिषेक टाले यांनी नुकतीच प्रतिष्ठेची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यां‍चा सन्मानपूर्वक गौरव आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विविध भाषांचे ५० हजारांपेक्षा अधिक पुस्तके
तीनदिवसीय पुस्तक प्रदर्शनाला ५० हजारांपेक्षा जास्त मराठी, इंग्रजी, हिंदी व सिंधी पुस्तके उपलब्ध आहेत. यासाठी सदामंगल पब्लिकेशन ही संस्था सहकार्य करत आहे. शहरातील नागरिकांसह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील पुस्तकप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com