इमारत व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप

इमारत व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप

मुरबाड, ता. २९ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेने ठाणे येथे कार्यालयासाठी भाड्याने घेतलेल्या इमारतीच्या व्यवहाराची चौकशी करावी, तसेच जुन्या कार्यालयातील फर्निचर व इतर साहित्य कुठे गेले, याचा शोध घेण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सचिव ग्रामविकास विभाग, पोलिस महासंचालक यांच्याकडे पाठवले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेला नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारकडून निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेची जुनी इमारत पाडण्यात आली असून या जागेतील कार्यालय भाड्याच्या जागेत स्थलांतरित केले आहे. या जागेचे महिन्याचे भाडे ३५ लाख रुपये देण्याचे ठरले आहे. या व्यवहारात ठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कार्यालय स्थलांतरित करण्याबरोबरच जी कार्यालये या इमारतीच्या बाहेर सुस्थितीत होती, त्यांचे भाडे कमी होते, अशी कार्यालयेदेखील भाडेतत्त्वावर नव्याने घेतलेल्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचा नाहक भाडे खर्च वाढला आहे, असा आरोप घरत यांनी केला आहे.

ठाणे जिल्हा परिषद बरखास्त झाल्यावर प्रशासनाने हा व्यवहार केला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, जिल्हा परिषदेची ठाणे येथील कन्याशाळेची इमारत रिकामी होती, त्यामुळे नवीन इमारत भाड्याने घेण्याऐवजी या जुन्या इमारतीची डागडुजी केली असती तर सर्व कार्यालये शाळेच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली असती, यामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकली असती, असे घरत यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com