अणुशक्तीनगरमधील रहिवाशांचे पुनर्वसन कधी?

अणुशक्तीनगरमधील रहिवाशांचे पुनर्वसन कधी?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : दक्षिण मध्य मुंबईचा गड जिंकण्यासाठी मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्राबल्य असलेला अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा इमारतीत अपुरे पाणी, कचऱ्याची समस्या, रस्त्याची रखडलेली कामे, पायाभूत सुविधांचा अभाव, डोंगराळ वस्तीवर दरड कोसळण्याचा धोका या समस्या येथील मतदारांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. यामुळे येथील मतदार आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
एकीकडे मुंबईला वीजपुरवठा करणारा औष्णिक वीज प्रकल्प, तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि भाभा अणू संशोधन केंद्रासारखी महत्त्वाची प्रतिष्ठाने, दुसरीकडे झोपडपट्टीत राहणारा कामगारवर्ग, काही प्रमाणात मध्यमवर्गीय, मुंबईला पुण्याशी जोडणारा वर्दळीचा सायन-पनवेल महामार्गदेखील या मतदारसंघातून जाते. तसेच दक्षिणेकडे समुद्र आणि पूर्वेकडे खाडी अशा सर्व मिश्र प्रकारे असलेला भाग अणुशक्ती नगर मतदारसंघ आहेत.
लोकसभेच्या २०१९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले. यंदा शिवसेनेत फूट पडली असून शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात भारतनगर, वाशीनाका, सह्याद्री नगर, अशोक नगर, पांजरापोळ, चिता कॅम्प आदी झोपडपट्टीबहुल भाग येतो. येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे; मात्र १५ वर्षांपूर्वी येथील काही घरे तोडण्यात आली आहेत; परंतु अद्यापही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. दर निवडणुकांमध्ये केवळ आश्वासनाची खैरात केली जाते, मात्र पुनर्वसनाचा प्रश्‍न जैसे थे आहे.
……..
डोंगराळ भागात जंगली श्वापदांचा धोका
महाराष्ट्रनगर भागात एक सब वे आहे. थोडा पाऊस पडला तरी या सब वेमध्ये पाणी जमा होते. धो-धो पावसात तर गुडघाभर पाणी येथे जमा होते. पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेने मोटारी बसवलेल्या आहेत; पण पावसाचा जोर अधिक असला की या मोटारी कुचकामी ठरतात. तसेच अणुशक्तीनगर टेकडी भागात रानकुत्रे, कोल्हे यांच्यासारखी जंगली श्वापदे आहेत. अनेकदा ही श्वापदे वस्तीत शिरतात. त्यामुळे तेथील नागरिक कायम भीतीच्या छायेखाली असतात.
---
संत कक्कैया मार्गाची रखडपट्टी
वाशीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात म्हाडा इमारतीत नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जास्त लोकसंख्यमुळे बससेवा सुरू आहे; पण संत कक्कैया मार्गाच्या कामासाठी स्थानिक रहिवासी, माजी नगरसेविका यांनी पाठपुरावा केला होता, मात्र या कामाची रखडपट्टी सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत.
----
नवाब मलिक यांची भूमिका महत्त्वाची
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यात अजित पवार यांचा गट महायुतीसोबत तर शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत आहे. अशात मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. माजी आमदार तुकाराम काते आणि नवाब मलिक यांच्या लढतीत मलिक यांना राहुल शेवाळे यांनी साथ दिली होती तर मलिक यांनी शेवाळे यांना मदत केली होती. त्यामुळे यंदा हे समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
--
वाशी नाका परिसर कायम गजबजलेला असतो. त्याता आता तेथे ट्रान्स हार्बर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगार वस्ती तेथे आहे; पण त्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा पडलेला असतो. असाच कचरा चीता कॅम्प परिसरातदेखील असतो. तेथे नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे.
- अनिकेत शिंदे, रहिवासी
---
अणुशक्तीनगरमध्ये नौदलाच्या अभियंत्याचे कार्यालय आहे. तसेच तेथे नौदलाचा महत्त्वाचा सामरिक तळ आहे. या तळाला लागून कच्च्या घरांची वस्ती उभी आहे. सुरक्षेच्यादृष्टीने ही वस्ती तेथून हलवली जावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसा निर्णय प्रशासनस्तरावर झाला आहे; पण अनेक वर्षे लोटूनही अद्यापही या वस्तीचे पुनर्वसन झालेले नाही.
- विजय कोळी, रहिवासी
--
अशोकनगर परिसरात २,५०० घरे तोडण्यात आली आहेत. त्यातील केवळ ६०० घरे तयार आहेत; पण अजून चाव्या दिल्या नाहीत. बिल्डर अनेकदा भाड्याचे पैसे देणे बंद करतो, त्यामुळे रहिवाशांना भाडे भरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- सागर सोनवणे, रहिवासी
--
प्रमुख समस्या
झोपडपट्टी पुनर्वसन
म्हाडा इमारतीत पाणी, कचऱ्याची समस्या
रस्त्याची कामे रखडली
डोंगराळ वस्तीवर दरड कोसळण्याचा धोका
---
२०१९ची परिस्थिती
विद्यमान खासदार - राहुल शेवाळे, शिवसेना (शिंदे गट)
राहुल शेवाळे - ४,२३,९१३
एकनाथ गायकवाड - २,७२,७७४
अणुशक्ती मतदारसंघातून मिळालेली मते - ६५,२१७
एकूण मतदार - १३,८८,३९०
पुरुष - ७,५२,६३९
महिला - ६,३५,६६०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com