आरटीईच्या मर्यादेला इंग्रजी मात्रा!

आरटीईच्या मर्यादेला इंग्रजी मात्रा!

पनवेल, ता. २९ (बातमीदार) : आरटीईअंतर्गत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थांमध्ये मोफत शिक्षण मिळत होते. त्यातच या वर्षी राज्य सरकारने त्यामध्ये मर्यादा आणि अटी घातल्याने अप्रत्यक्षरीत्या दर्जेदार शिक्षणाच्या अधिकारापासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. आता पनवेल महापालिका क्षेत्रातील अशा मुलांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोनशे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी अल्प आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकसुद्धा आग्रही असतात. मात्र, खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण त्यांच्या खिशाला परवडत नाही. शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत अशा शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबत सरकारने निर्णय घेतला होता. पनवेल परिसरामध्ये अशाप्रकारे जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त जागा राखीव करण्यात येत होत्या; परंतु राज्य सरकारने एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर अनुदानित आणि शासकीय शाळा असेल तर खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार नाही, अशा प्रकारचा नियम आणला आहे. शासकीय व अनुदानित शाळा या मराठी माध्यमांच्या आहेत. त्यामुळे इंग्रजी शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देणे कठीण झाले; परंतु या सर्व पार्श्‍वभूमीवर पनवेल महापालिकेने पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

----------
१० मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
पालिकेने प्रवेशप्रक्रियासुद्धा सुरू केली असून प्रवेश देण्यासाठी १८ एप्रिलपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. याला पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. १० मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होणार आहे. हे प्रवेश अर्ज भरण्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहील, अशी माहिती पनवेल महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

----------
प्रत्येक वर्गामध्ये ४० विद्यार्थी
सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गांसाठी प्रत्येकी एक-एक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गातील ४० विद्यार्थ्यांची २० मुले व २० मुली अशी क्षमता असणार आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना सदर प्रवेशप्रक्रियेमध्ये प्राधान्य राहणार आहे.

------------
प्रवेशासाठी कागदपत्रांची आवश्यकता
प्रवेशप्रक्रियेसाठी बालकाचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. तसेच पालकाचा रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी दाखला, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, रेशन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, तसेच पनवेल महापालिकेचा कर भरल्याची पावती, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे.

-------------
पूर्व प्राथमिक शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल महापालिकेने यापूर्वी इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा सुरू केल्यानंतर त्याला महापालिका कार्यक्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. आता महापालिकेने इंग्रजी माध्यमासाठी दुसरी ते पाचवीपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीचे प्रवेश अर्ज लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी ७७१००८३८७७ व ९९३०११९०३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल महापालिकेकडून करण्यात आले आहे.

---------
पनवेल महापालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करत असताना आयटीज स्कूल्सबरोबर करार केले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील असणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढणार आहे.
- डॉ. प्रशांत रसाळ, आयुक्त, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com