वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे उपकरणे नादुरुस्‍त

वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे उपकरणे नादुरुस्‍त

नेरळ, ता. २९ (बातमीदार) ः वाढता उष्‍मा, त्‍यात विजेचा लपंडावामुळे नागरिक हैराण आहेत. अशात कर्जत तालुक्यातील आसलपाडा येथे विजेच्या कमी-जास्‍त प्रवाहामुळे अनेक ग्रामस्थांची एका दिवसात विद्युत उपकरणे जळाल्‍याचे समोर आले आहेत. गावापासून जंगल भागात असलेल्या एका फार्महाऊससाठी नव्याने वीजवाहिनी टाकण्यात आली. खासगी ठेकेदाराने हे काम केले, मात्र काम पूर्ण झाल्‍यावर वीजपुरवठा सुरू होताच त्‍यात तांत्रिक बिघाड झाला आणि अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्‍त झाली. याप्रकरणी नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आसलपाडा गावापासून काही अंतरावर असलेल्‍या जंगल भागात मुंबईतील एका धनिकाने फार्महाऊस बांधले आहे. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्‍याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येते. फार्महाऊसला वीजपुरवठा व्हावा, यासाठी फार्महाउसच्या मालकाने महावितरणकडे पत्र दिले होते. त्‍यासाठी खासगी ठेकेदाराकडून वीज खांबही उभारण्यात आले होते, मात्र कामात काही त्रुटी राहिल्‍याने वीजपुरवठा सुरू करताच गावातील अनेकांचे टीव्ही, फ्रिज, बोअरिंग पंप, मिक्सर अशी विद्युत उपकरणे जळाल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. प्रकरणी पोलिस तक्रार करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

फार्महाऊसला वीजपुरवठा करण्याचे काम सुरू असताना आमच्या घरातील टीव्ही, फ्रिज आदी वस्‍तू जळाल्‍या. याबाबत फार्महाऊसच्या मालकाकडे विचारणा केली असता, त्‍यांनी उर्मठ भाषा वापरत दमदाटी केली. त्यामुळे आम्ही पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार करणार आहोत.
- रविना राजेश शेंडे, ग्रामस्थ, आसलपाडा

मी सरपंच असताना फार्महाऊससाठी कुठलीही परवानगी दिली नव्हती. तर आताही कुठल्याही स्वरूपाची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र संबंधित मालक कायम अरेरावीची भाषा वापरतो. त्‍यांनी टाकलेल्‍या वीजवाहिनीमुळे अन्य ग्रामस्‍थांना त्रास होतो. अनेकांच्या घरातील वस्‍तू नादुरुस्‍त झाल्‍या आहेत.
- रमेश लदगे, माजी सरपंच, आसल ग्रामपंचायत

आसलपाडा येथील फार्महाऊससाठी वीजपुरवठा व्हावा, असा अर्ज आला होता. तेव्हा त्यांचा सातबारा बघून आम्ही परवानगी दिली. यासाठी ग्रामपंचायत ना हरकत दाखला आदी गोष्टी आम्हाला गरजेच्या नाहीत. तर वीजपुरवठा करताना काही त्रुटी राहिल्‍या असल्‍यास, संबंधित कनिष्ठ अभियंत्‍यांकडे चौकशी करून दुरुस्‍ती केली जाईल.
- प्रकाश देवके, उपअभियंता

मुंबईतील धनिक येथे येऊन बंगले, फार्महाऊस बांधतात. त्यांच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. पण गरीब ग्रामस्थांना जर कुणी धमकावत असेल, दादागिरी करत असेल तर अन्याय का सहन करायचा, आज येथील फार्महाऊस मालकामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले असताना तरी तो उर्मट भाषेतच बोलतो. याबाबत पोलिस ठाणे व वनविभागाकडे रीतसर तक्रार करू.
- संदेश कराळे, ग्रामस्थ, आसलपाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com