दिघ्यातील पाण्याची समस्या मिटणार

दिघ्यातील पाण्याची समस्या मिटणार

वाशी, ता. २९ (बातमीदार) : दिघा परिसरातील नागरिकांना एमआयडीसीच्या बारवी धरणाचे पाणी मिळत आहे. एमआयडीसीने शटडाऊन घेतल्यास किंवा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्यास नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकंती करावी लागते. सध्या एमआयडीसीकडून पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या ओएस वन भूखंडावर भूमिगत व उच्चस्तरीय पाण्याची टाकी बांधण्याचे काम प्रगतिपथावर असून पाण्याच्या टाकीचे काम पूर्णत्वास आले आहे. जून महिन्यापर्यंत पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिका आधिकाऱ्यांना दिल्या असून यामध्ये मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेदेखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पाण्याच्या टाकीचे काम जवळपास १२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असून काम पूर्ण झाल्यानंतर दिघ्यातील रहिवाशांची गैरसोय टळणार आहे. त्यातच मोरबे धरणाची जलवाहिनीदेखील दिघ्यापर्यंत येणार असून त्यांचेदेखील पाणी सुरू झाल्यानंतर नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिघा परिसरामध्ये एमआयडीसीच्या बारवी धरणाचे पाणी मिळते. पालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणांचे पाणी आजपर्यंत दिघ्याला मिळाले नाही. दिघ्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालिका सभागृहात वारंवार आवाज उठवल्यानंतर पालिकेने मोरबे धरणाची जलवाहिनी दिघ्यापर्यंत टाकण्याचे काम केले आहे.

----------
१२ कोटी खर्च
पाण्याची साठवणूक करण्यासाठी दिघ्यात पाण्याची टाकीच उपलब्ध नसल्यामुळे दिघांवासीयाचे पाण्यावाचून हाल होत होते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने पाण्याची टाकी मंजूर केली असून १२ कोटी खर्च करून उच्चस्तरीय व भूमिगत पाण्याची टाकी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाण्याच्या टाकीचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत काम संपुष्टात येईल. त्यामुळे दिघावासीयांची पाण्यासाठी होणारी चिंतादेखील दूर होईल.
----------
दिघावांसीयाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी, यासाठी पालिकेमध्ये उच्चस्तरीय व भूमिगत पाण्याची टाकी व्हावी, यासाठी आवाज उठवला होता. त्यांनतर पालिकेकडून दिघ्यासाठी पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू केले असून पाण्याची टाकी दृष्टिक्षेपात आली आहे. टाकीचे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
- नवीन गवते, माजी स्थायी समिती सभापती, महापालिका
-----------
दिघ्यातील पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्पयात असून नुकताच पालिका आयुक्तांनी पाहणी दौरा केला आहे. जून महिन्याच्या आधीच पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ते कामदेखील लवकरच पूर्ण होईल.
- डॉ. कैलास गायकवाड, विभाग अधिकारी, दिघा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com