अधिकारांपासून वंचित ठेवल्याची भावना

अधिकारांपासून वंचित ठेवल्याची भावना

वाडा, ता. २९ (बातमीदार) : जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीतील गाव-पाड्यात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत लोकांचा लोकसहभाग असावा, यासाठी अंदाजपत्रकाच्या पाच टक्के लोकवर्गणी भरून घेणे गरजेचे होते, मात्र कंत्राटदार आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांनी नागरिकांना यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे या योजनेवर नागरिकांची मालकी असावी आणि ती सिद्ध करावी, यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन लोकवर्गणीच्या पावत्या फाडून घेतल्या.

पालघर जिल्ह्यात जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. नियमानुसार लोकांचा लोकसहभाग असणे गरजेचे होते. यासाठी काही टक्के लोकवर्गणी ठेवण्यात आली होती, मात्र पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, शाखा अभियंते व कंत्राटदार यांनी नागरिकांकडून लोकवर्गणी भरून घेतली नाही. आता काही योजनांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, तर योजनांचा काळावधी पूर्ण होऊनही त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा निधी वाया गेला असून नागरिकांना ‘हर घर जल’ हे दिवास्वप्नच राहणार असल्याचे दिसून येते.

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन लोकवर्गणीच्या पावत्या फाडून घेतल्या. त्यामुळे जलजीवन योजनेचे पाणी तापणार असल्याचे दिसून येत आहे. घोणसई येथे गाव कमिटी प्रमुख सुरेश वाघ, नारे येथे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीच्या पावत्या फाडून घेतल्या.

पाणीपुरवठा योजनेवर आमची मालकी व हक्क असावा, यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन लोकवर्गणी भरली. आम्हाला या योजनेपासून पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी अंधारात ठेवले होते, आता याची माहिती झाली आहे. प्रत्येक घरात, झोपडीत नळाचे पाणी मिळेपर्यंत, हे आंदोलन असेच सुरू राहील.
- गीता वाघ, महिला, घोणसई

वाडा तालुक्यातील अनेक योजना निकृष्ट दर्जाच्या आहेत. सरकारने प्रत्येक गाव-पाड्यांसाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे, मात्र कामे निकृष्ट झाल्याने पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. आम्हाला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
- अश्विनी घोरकणे, महिला

तालुक्यातील निधीची जमवाजमवी
ग्रामपंचायत पावत्या जमा रक्कम
कुयलू ४१ ४,११०
मांडा ५९ २,८३०
सरसओहळ ५५ ४,३४०
घोणसई २६ २,११०
डोंगस्ते २६ २,६००
कोंढले ४७ ९४०
बिलावली ४८ ४८०
तिळगाव २२ २२०
देवळी ४२ ६९०
मांडा ५ १००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com