डहाणूच्या १०२ गावांत ‘जलजीवन’ची रखडपट्टी

डहाणूच्या १०२ गावांत ‘जलजीवन’ची रखडपट्टी

कासा, ता. २ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात जलजीवन योजनेंतर्गत हर घर जल योजना राबवली जात आहे. तालुक्यात जवळपास १०७ ठिकाणी ही योजना मंजूर झाली आहे; परंतु एप्रिल संपला तरी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांतच योजना पूर्ण करण्यात आली आहे. तर १०२ गावांत जलजीवन योजनेची कामे अजूनही अपूर्ण आहेत. परिणामी, गाव-पाड्यांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलजीवन योजनेची कामे सुरू करण्यात आली. गेल्या वर्षभरात केवळ पाच ठिकाणी जलजीवन योजना पूर्ण झाली आहेत. यात पारसवाडी, जामशेत, धाडणे, कुंजावे, भवाडी-कोसेसरी या गावांत घरोघरी नळ योजनेद्वारे लोकांना पाणी मिळू लागले आहे, तर ५० हून अधिक गावांत कामे बंद असल्याची तक्रार विविध ग्रामपंचायतीमधील सरपंच-उपसरपंचामार्फत केली जात आहे. बहुसंख्य गावात जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक कंत्राटदारांचे काम बंद असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर अनेक कंत्राटदारांनी कामे सुरू न केल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत त्यांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानंतरसुद्धा काम अपूर्ण ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कामे अर्धवट पडलेली आहेत. तालुक्यात २०० कोटींची मंजूर झालेली कामे असूनसुद्धा अनेक कामे सुरू झालेली नाहीत. दीड महिन्यात पावसाला सुरवात होणार असून अनेक कामे नदी-नाल्याकिनारी सुरू असून पावसाळ्यात ही अपूर्ण कामे कशी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आमच्या गावात जलजीवन योजनेसाठी नदीच्या किनारी विहीर बांधली असून ती पावसाळ्यात बुडू शकते. विहिरीचे काम जवळपास पूर्ण असून कठड्याचे बांधकाम शिल्लक आहे. काही ठिकाणी जलवाहिनी टाकली आहे, तर पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. काही दिवसांत पावसाला सुरुवात झाल्यानंतर हे काम कसे पूर्ण होईल?
- कविता मातेरा, महिला कार्यकर्ती, म्हसाड

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनची अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. पाच ठिकाणी योजना पूर्ण झाली आहे.
- मनीष भामरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, डहाणू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com