पनवेल पालिकेच्यावतीने युवा हवामान परिषद

पनवेल पालिकेच्यावतीने युवा हवामान परिषद

पनवेल येथील युवा हवामान परिषदेला प्रतिसाद
पनवेल (बातमीदार)ः जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने पनवेल महापालिका व पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच युवा हवामान परिषद २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ व उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास महापालिकेचे उद्यान विभागाचे पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे, पिल्लईच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन वडेर, उपप्राचार्य दीपिका शर्मा, कार्यक्रम समन्वयक आरती सुखेजा, कॉमर्स विभाग समन्वयक डॉ. किरण देशमुख उपस्थित होते. यावेळी हवामान बदल विषयांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन धोरण निर्मितीमध्ये तरुणांचा सहभाग व पर्यावरण संरक्षण या विषयावर यंग इंटरप्रायझेस आणि फिल गुड इको नेचर संस्थेचे संस्थापक शारंग अंबडकर, सी-फोर्टीज सिटी संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक निखिल कुलकर्णी, ब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्ते राज सराफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्‍पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या परिषदेस महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक सहभागी झाले होते.
...............
गजा आनन म्हात्रे यांच्या कादंबरीला पुरस्कार
नवी मुंबई (वार्ताहर) : लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार नवी मुंबईतील प्रसिद्ध लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांना प्रदान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कादंबऱ्यांमध्ये म्हात्रे यांच्या ‘आठवणींच्या रंगीत चिमण्या’ कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात २८ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वासुदेव मुलाटे, अध्यक्ष- ॲड. बोडके, डॉ. दुष्यंत कटारे, सचिव- प्रकाश दागधिने, श्रीधर गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते कादंबरी, कथा, कविता या तिन्ही साहित्य प्रकारांत पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्रातून नव साहित्यिक हजर होते. यावेळी गज आनन म्हात्रे यांनी पुरस्काराच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तेजस्वी विचार मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. ॲड. अगंद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
............
तुर्भे जनता मार्केट परिसरात बिट चौकीचे उद्‍घाटन
वाशी (वार्ताहर)ः मागील अनेक महिन्यांपासून तुर्भेवासीयांकडून जनता मार्केट परिसरात पोलिस बिट चौकीची मागणी करण्यात येत होती. तुर्भेवासीयांच्या मागणीला अखेर यश आले असून नुकतेच येथील जनता मार्केटमध्ये पोलिस बिट चौकीची स्थापना करण्यात आली आहे. एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांच्या हस्ते या बिट चौकीचे उद्‍घाटन करण्यात आले. गेल्या काही महिन्‍यांपासून तुर्भे येथील जनता मार्केट परिसरात खुल्‍लेआम वेशा व्यवसाय व अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र, पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने जनता मार्केटमधील व्यापारी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांतर्फे १४ फेब्रुवारी रोजी जनता मार्केट ते एपीएमसी पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला होता. जनता मार्केट परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि जुनी बंद पडलेली बिट चौकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत पोलिसांची गस्त वाढवून बिट चौकी नव्याने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाल्‍याने नागरिकांकडून समाधान व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
..................
सीवूडमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
नेरूळ (बातमीदार) ः बेलापूर विभागातील सीवूड्स परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील पदपथ आणि रस्त्याचा काही खाद्यपदार्थ विक्रीसह इतर साहित्य विक्री करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला होता. याप्रकरणी पालिकेकडे तक्रारी वाढल्‍या होत्‍या. बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सीवूड्स विभागातील बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्‍यामुळे आता सीवूड्समधील वर्दळीच्‍या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे. फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com