‘भातसा-तानसा’च्या पाणी पातळीत घट

‘भातसा-तानसा’च्या पाणी पातळीत घट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे तापमान वाढू लागले आहे. तळपता सूर्य आग ओकत आहे. अशात मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी घटत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. प्रमुख तलावांपैकी एक असलेल्या भातसा आणि तानसा धरणातील जलसाठ्यात घट होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबईतील पिण्याच्या पाण्याची चिंता अधिकच वाढली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा २० टक्क्यांवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत २७ एप्रिलपर्यंत फक्त २०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी भातसा आणि तानसा धरणातील जलसाठ्यात चांगलीच घट झाली आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा बसत असून वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे. धरणातील पाण्याची पातळीत घट होत असल्याने मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारने राखीव पाणीसाठा देण्याची तयारी दर्शवली आणि मार्च महिन्यातील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले होते.
.....
पालिकेचे १५ जुलैपर्यंतचे नियोजन
मुंबईला पाणीपुरवठा सातही धरणात सद्य:स्थितीत दोन लाख ९३ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात राज्य सरकारने दिलेले दोन लाख ३० हजार दशलक्ष लिटर पाणी १५ जुलैपर्यंत मुंबईची तहान भागवेल, असे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.
...
जलसाठ्याची स्थिती चिंताजनक
मुंबईला सुमारे दोन लाख दशलक्ष लिटर राखीव साठ्यातील पाणी उचलण्याची परवानगी सरकारने दिली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचे तलाव असलेल्या भातसा आणि तानसामधील पाण्याची पातळी खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या तलावांमध्ये अनुक्रमे भातसात १८ टक्के आणि तानसात ३६ टक्के इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.
----
गेल्या तीन वर्षांतील २७ एप्रिलपर्यंत
एकूण पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
२०२४ : २,९३,५५२ (२०.२८%)
२०२३ : ३,८४,९६० (३८.६०%)
२०२२ : ४,३७,२९२ (२९.५२%)
-----
सध्या असलेला साठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - ४४,४६८
मोडक सागर - ३२,०००
तानसा - ५२,७२४
मध्य वैतरणा - १८,०३९
भातसा - १,३३,५८५
विहार - ९,१७४
तुळशी - ३,०७८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com