आला उन्हाला कार्यकर्त्यांनो सांभाळा

आला उन्हाला कार्यकर्त्यांनो सांभाळा

ठाणे शहर, ता. २९ (बातमीदार) : मागील काही दिवस ठाणेकरांवर सूर्यदेवाचा प्रकोप होत आहे. सोमवारी (ता. २९) देखील ठाण्यातील तापमानाचा पारा ४१.३ अंश डिग्री सेल्सिअस इतका होता. या उष्णतेच्या लाटेचा सामना लोकसभेचे नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना करावा लागला. तसेच आता पुढील दिवस प्रचाराचे असल्याने कार्यकर्ते आणि उमेदवार, नेत्यांच्या मनात तापमानवाढीमुळे धडकी भरली आहे.

गेल्या पंधरवड्यात ठाण्यातील तापमानात काहीसा गारवा आला होता. ४२ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहचलेले तापमान ३६ अंशापर्यंत आले होते. आता शनिवार (ता. २७) पासून तापमानाने सलग ४१ अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त राहिला आहे. आता पुढील महिना जास्त तापमानाचा असल्याने हा पूर्ण महिना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घाम फोडणारा ठरणार आहे. शहरातील तापमान मे महिन्यात सरासरी ४० अंशाचा पारा तेवत ठेवणारा राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा काळ हाच असल्याने तो प्रचारात नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. नेत्यांना उमेदवारांसाठी भर उन्हात रोड शो, सभा, रॅलीत सामील व्हावे लागणार आहे. उमेदवाराला मात्र नेते, कार्यकर्ते आणि गल्लीबोळात प्रचारासाठी लोकांचा ताप सहन करावा लागणार आहे.

उमेदवारांच्या प्रचारनीतीचा अंदाज घेतला असता उमेदवारांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात टोप्यांची व्यवस्था केली असल्याचे दिसून आले. सोबतच उमेदवार प्रचाराच्या वेळेत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स सोबत ठेवणार असल्याची माहितीही मिळाली. सोमवारी (ता. २९) रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात २१ नामांकन दाखल झाले. यावेळी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे महिला, तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठांना आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी भर उन्हात चटके सोसत यावे लागले.

पाणपोईची व्यवस्था
वाढत्या उष्म्यात घराबाहेर पडलेल्या लोकांची तहान भागावी, यासाठी शहरात रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी अशा पाणपोई सुरूदेखील झाल्या आहेत. उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था केली आहे. कार्यकर्त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी टोप्या, मफलरदेखील पुरविले जाणार आहेत.

प्रशासन सज्ज
निवडणूक अधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणा, पाणीपुरवठा विभाग यांना सज्ज राहायचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ३० खाटांचा वातानुकूलित वॉर्ड सज्ज ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी उष्माघात आणि तापमानाने त्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिन्या सज्ज ठेवल्या गेल्या आहेत. सरकारी, खासगी रुग्णालयातील रुग्णवाहिन्यांना पुरवणाऱ्या व्यवस्थेला तसे निर्देश देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com