किरकोळ कारणातून लोकलमधुन ढकलले

किरकोळ कारणातून लोकलमधुन ढकलले

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : सीबीडी ते नेरूळदरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला चौघा तरुणांनी बेदम मारहाण करून धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी प्रवासी एका हाताने अधू झाला असून पनवेल रेल्वे पोलिसांनी चौघांविरोधात मारहाणीसह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशमधील कोसेबी जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेला राजेंद्रकुमार दिवाकर (३२) सात दिवसांपूर्वी गावावरून ऐरोली येथे राहणाऱ्या भावाकडे लॉन्ड्रीच्या कामासाठी आला होता. उलवे सेक्टर १० मधील केदारनाथ लाँन्ड्रीमध्ये काम मिळाल्याने शुक्रवारी (ता. २६) लॉन्ड्रीचे काम बंद करून राजेंद्र हा पनवेल येथे राहणाऱ्या नातेवाइकाला भेटण्यासाठी गेला होता. मात्र, नातेवाइकाची भेट झाली नसल्याने पुन्हा उलवे येथे जाण्यासाठी पनवेल येथून लोकल पकडून बेलापूर स्थानकात उतरला होता; पण लोकल नसल्याने त्याने नेरूळ रेल्वे स्थानकात उतरण्यासाठी पुन्हा सीएसएमटी लोकल पकडली होती. यावेळी लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या चार तरुणांनी राजेंद्रकुमारला लोकलमध्ये चढू दिले नसल्याने बाचाबाची झाली. तसेच लोकलमध्ये चढल्यानंतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली होती. तसेच एकाने चाकूने गालावर आणि पाठीत वार केले होते. यावेळी जखमी राजेंद्रकुमार याने चौघा मारेकऱ्यांची माफी मागितल्यानंतर त्याला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिले गेले. या प्रकाराची माहिती काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी राजेंद्रकुमारला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजेंद्रकुमार याला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
------------------------------
लोकलच्या चाकाखाली हाताचा चेंदामेंदा
या घटनेत धावत्या लोकलखाली आल्याने राजेंद्रकुमारच्या उजव्या हाताचा चेंदामेंदा झाला आहे. तसेच त्याच्या पायाच्या नडगीत फ्रॅक्चर झाला आहे. तसेच पाठीमध्ये चाकू खुपसल्याने खोलवर जखम झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
--------------------------------
प्रवाशांकडून बघ्याची भूमिका
या घटनेतील जखमी राजेंद्रकुमारला लोकलमध्ये चौघे तरुण बेदम मारहाण करत असताना लोकलच्या डब्यामध्ये अनेक प्रवासी उपस्थित होते. यावेळी एकही प्रवासी वाचवण्यासाठी पुढे आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com