नवी मुंबई महापालिकेला विजेचा झटका

नवी मुंबई महापालिकेला विजेचा झटका

वाशी, ता. ३० (बातमीदार) : ग्रीन बिल्डिंग म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये विजेची उधळपट्टी होत आहे. वातानुकूलित कार्यालयाच्या हट्टाचा तिजोरीवर भार वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ३५ लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल चार कोटींपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर होऊ लागला आहे.
सरकारी कार्यालयांची उभारणी करताना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कमीतकमी जागेचा जास्तीत जास्त वापर करणेही अभिप्रेत असते; परंतु नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची रचना करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. येथे जास्तीत जास्त जागेचा कमीतकमी वापर केला जात आहे. मुख्यालयात सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत नाही. परिणामी, पूर्णपणे विजेवर अवलंबून राहावे लागत आहे. संपूर्ण इमारतीमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वीजबिलामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मुख्यालयाची उभारणी करण्यात आली, त्यावेळी महिन्याला १२ ते १५ लाख रुपये वीजबिल येत होते. आता हा आकडा ३० ते ४० लाखांवर पोहोचला आहे. यावर्षी मार्च २०२४ या महिन्यात ३४ लाख ३८ हजार व जून २०२३ या महिन्यात ४२ लाख २६ हजार रुपये बिल आहे. हे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील सर्वात जास्त बिल आहे. सरासरीनुसार महापालिका मुख्यालयात दरदिवशी एक लाख रुपयांची वीज वापरली जात आहे. गत आर्थिक वर्षामध्ये वीजबिलावर चार कोटी २७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
------
नवी मुंबई महापालिकेने वीजबचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालिका मुख्यालयाचे कार्यालय हे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत असते. सकाळी आठ वाजल्यापासून इमारतीमधील एसी सुरू करण्यात येतात. दोन तास एसीचा वापर फुकट जातो. मुख्यालयाच्या स्थापनेवेळी पालिकेने कुलरही बसवले होते. ते सध्या बंद आहेत. त्याची दुरुस्ती करावी. सायंकाळी सहा वाजल्यानंतर काही मोजकेच अधिकारी मुख्यालयात असतात. त्यामुळे त्यांच्यापुरते एसी चालू ठेवावेत. यातून वीजबिलात बचत होऊन जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही.
- समीर बागवान, सामाजिक कार्यकर्ता

----------
महिनानिहाय वीजबिलाचा तपशील
महिना वीजबिल
एप्रिल २०२३ ३३,१०,९४९
मे २०२३ ४०,६२,३४४
जून २०२३ ४२,२६,१८२
जुलै २०२३ ३५,५९,४३७
ऑगस्ट २०२३ ३६,२९,९२७
सप्टेंबर २०२३ ३६,३३,६२५
ऑक्टोबर २०२३ ३८,७१,१०१
नोव्हेंबर २०२३ ३४,२९,५३५
डिसेंबर २०२३ ३१,६४,९००
जानेवारी २०२४ ३१,०८,९२३
फेब्रवारी २०२४ ३०,७०,८०४
मार्च २०२४ ३४,३८,८३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com