महिलांचा आवाज लोकसभेत पोहोचणार का?

महिलांचा आवाज लोकसभेत पोहोचणार का?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : तब्बल ४५ लाख महिला मतदार असलेल्या मुंबईतून दरवेळी एक तरी महिलेला लोकसभेत पाठवण्याची परंपरा आहे. यावेळी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे) गटाने प्रत्येकी एक एक महिला उमेदवार दिला आहे. तर भाजपने विद्यमान महिला खासदाराला उमेदवारी नाकारली आहे. दरवेळी एक महिला खासदार निवडून देण्याची परंपरा मुंबई राखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबईकरांनी आजपर्यंत अनेक महिला प्रतिनिधी लोकसभेत पाठवले आहेत. त्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून महिलांना कमी-अधिक प्रमाणात उमेदवारी दिली जात होती. मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ असून १९७० साली मृणाल गोरे मुंबईतून महिला खासदार म्हणून संसदेत गेल्या होत्या. तसेच जयंतीबेन मेहता वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या होत्या.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान महिला खासदार पूनम महाजन यांना भाजप तिसऱ्यांदा संधी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे भाजपच्या वाट्याच्या उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या उर्वरीत दोन मतदारसंघातूनही पक्षाने पुरुष उमेदवारांना संधी दिली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्या हाती आहे. २००९ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त, त्यानंतर २०१४, २०१९ मध्ये भाजपच्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून महिला विरुध्द महिला अशीच होत आली आहे. मात्र १५ वर्षानंतर पहिल्यांदा महिला विरुध्द पुरुष उमेदवार अशी लढत होणार आहे. यावेळी भाजपने पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसने १५ वर्षांची महिला उमेदवार देण्याची परंपरा कायम ठेवत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महिला प्रतिनिधी निवडूण देण्याची दीड दशकाची परंपरा हा मतदारसंघ कायम ठेवणार का ते बघावे लागणार आहे.
…..
यामिनी जाधव
मुंबईतील तीन जागा शिवसेना (शिंदे) गटाच्या वाट्याला आल्या आहेत. त्यापैकी दक्षिण मुंबईतून पक्षाने भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना मैदानात उतरवले आहे. एकेकाळचे मातोश्रीचे एकनिष्ठ आणि मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहे. यामिनी जाधव पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. यापुर्वी त्यांनी तिन टर्म नगरसेविका म्हणून काम केले आहे. या मतदारसंघात त्यांना विद्यमान खासदार आणि माजी अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
...
वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्या धारावीमधून चार टर्म आमदार आहेत. त्यांचे वडिल दिवंगत एकनाथ गायकवाड यांचा राजकीय वारसा त्यांनी सक्षमपणे चालवला आहे. पक्षाचा दलित चेहरा असलेल्या गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम पाहत आहेत. वर्षा गायकवाड या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांची लढत ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासोबत होणार आहे.

----------------------
मुंबईतील महिला मतदार
एकुण मतदार-४५ लाख
मुंबई शहर- ११ लाख २७ हजार
मुंबई उपनगर- ३४ लाख २६ हजार
------------------------
महाराष्ट्रातील महिला उमेदवार
यंदा राज्यात भाजपने सर्वाधिक म्हणजे सहा महिलांना संधी दिली आहे. काँग्रेसने तीन तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन महिला तर शरद पवार गटाने केवळ एकच महिला उमेदवार दिला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून दोन तर वंचितने पाच महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
….
राज्यभरातील महिला उमेदवारांचे चित्र

भाजप
१.डॉ. हिना गावीत, नंदुरबार
२.स्मिता वाघ, जळगाव
३.पंकजा मुंडे, बीड
४.नवनीत राणा,अमरावती
५.रक्षा खडसे, रावेर
६. डॉ. भारती पवार, दिंडोरी

शिवसेना (ठाकरे गट)
१.वैशाली दरेकर, कल्याण
२.भारती कामडी, पालघर

शिवसेना (शिंदे गट)
१.जयश्री पाटील, यवतमाळ-वाशीम
२.यामिनी जाधव,दक्षिण मुंबई
..
राष्ट्रवादी ( शरद पवार गट)
१.सुप्रिया सुळे,बारामती

राष्ट्रवादी (अजित पवार गट)
१.सुनेत्रा पाटील, बारामती
२.अर्चना पाटील,धाराशिव

काँग्रेस
१.प्रणिती शिंदे, सोलापूर
२. प्रतिभा धानोरकर,चंद्रपूर
३. वर्षा गायकवाड, उत्तर मध्य मुंबई
…...
राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे, म्हणून एक बाजूला काही जागा राखीव ठेवल्या जात असतानाच मुंबईसारख्या महानगरात त्यांना योग्य प्रतिनिधित्व न देणे हे समजण्यापलीकडे आहे. तसेच एखाद्या ठिकाणी महिलेला उमेदवारी द्यावीच लागली तर ती प्रस्थापित राजकारण्यांच्या घरातील महिलेला दिली जाते ही बाब अस्वीकार्य आहे.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
…..
महिला सर्व क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत, मात्र राजकीय क्षेत्रात त्यांना पुरेशी संधी दिली जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे. महिलांनी आणि समाजाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
- वृषाली मगदूम, विश्वस्त, स्त्री मुक्ती संघटना
…...
राजकारणात महिला सन्मानाच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात सन्मान देण्याची वेळ आली तर हात आखडते घेतले जातात.
- विद्या चव्हाण, माजी आमदार

…..
महिला मतदारांची मोठी संख्या असूनही त्यांना योग्य प्रतिनिधित्व न देणे हे पुरुषप्रधान सांस्कृतीचा परिणाम आहे. भविष्यात एखाद्या महिलेच्या हाताखाली काम करावे लागू नये, म्हणून त्यांना डावलणे अन्यायकारक आहे.
- तृप्ती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
…..
महिलांना समान वाट्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेचा हा आरसा, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांना डावललेल्या उमेदवारीतून लख्खपणे दिसते. केवळ जाहीरनाम्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा मुद्दा घेऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात ते दाखवून द्यायला पाहिजे.
- शकुंतला भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com