जलजीवन योजनेच्या कामांचा बोजवारा

जलजीवन योजनेच्या कामांचा बोजवारा

खर्डी, ता. १ (बातमीदार) : केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा शहापूर तालुक्यात सर्वच १७९ ठिकाणी बोजवारा उडाला आहे. त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने मागील महिनाभरापासून मोर्चे काढून जनजागृती केली होती. त्याच अनुषंगाने श्रमजीवी संघटनेमार्फत तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत कार्यालयात १० ते १०० रुपये प्रत्येक नागरिकाने लोकवर्गणी भरून आपला लोकसहभाग दाखवला आहे. आता लोकवर्गणी आम्ही भरली असून आम्हाला आमच्या हक्काच्या घरात पाणी लवकरात लवकर उपलब्ध करा, अशी मागणी केली आहे.

शाश्वत पाणीसाठ्यावरून नळपाणीपुरवठा योजना करून ‘हर घर नल से जल’ ही जलजीवन मिशन महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणली आहे; मात्र ही योजना ग्रामीण भागात अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने सदोष कामे केल्याने बारगळली आहेत. त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने महिनाभरापासून जनजागृती करत हंडा मोर्चा काढला. ठिकठिकाणी जलवाहिनी उखडून टाकल्या. या आंदोलनाचा धसका घेत जिल्ह्यातील बरेचसे अभियंते आणि ग्रामसेवक रजेवर गेले होते.

शहापूर तालुक्यातील पिवळी, दहिगाव, टेंभा, किन्हवली, गोठेघर, आसनगाव, बिरवाडी, धामणी, शिरोळ, साकडबाव, अस्नोली, मुगाव, खराडे यांसारख्या ४३ ग्रामपंचायत कार्यालयात दोन हजार ७२० कुटुंबांनी लोकवर्गणी भरल्याची माहिती प्रकाश खोडका यांनी दिली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीत लवकरच लोकवर्गणी भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलजीवन योजनेत स्थानिकांनी पैसे भरून लोकसहभाग घेतला आहे. आता येथील रहिवाशांचा या योजनेवर हक्क आहे, दारात पाणी घेतल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. संघटनेने गेल्या महिनाभरापासून हंडा मोर्चा करून जनजागृती केली आहे. शासनाने या योजना लवकर पूर्ण कराव्यात. - प्रकाश खोडका, सचिव, श्रमजीवी संघटना, शहापूर

फोटो : शहापूर तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीमध्ये लोकवर्गणी भरताना स्थानिक महिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com