बाहेरचे आम्हाला सांगणारे कोण?

बाहेरचे आम्हाला सांगणारे कोण?

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : बाहेरचे लोक आपल्या राज्यात येतात आणि आपल्यालाच नकली शिवसेना, भटकती आत्मा असे बोलतात. बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी (ता. ३०) शिवसेनेकडून (ठाकरे) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याअगोदर महाविकास आघाडीकडून रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. त्यांना असे भटकती आत्मा वगैरे म्हणणे फारच दुर्दैवी आहे. देशभरात भाजपच्या विरोधकांवर ईडी-सीबीआयचा प्रयोग केला जात आहे. निवडणूक आयोगही डोळे बंद करून बसले आहे. शिंदे गट आणि भाजपच्या मित्र पक्षांना जनता उभे करणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते, तेव्हा हिंदू-मुस्लिम विषय घेऊन आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुमचा वापर होणार आहे हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होते. तुम्ही सोन्याच्या ताटात बसून जेवत होतात; पण तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा निर्माण झाली. तुम्ही तुमचे वाटोळे करून घेतले, असे म्हणत आव्हाड यांनी शिंदे यांच्या बंडावर टीका केली.
तर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना वायकर यांचा पराजय होईल, याबद्दल विश्‍वास व्यक्त केला. रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरे यांनी शून्यातून उभे केले होते. त्यामुळे वायकर यांनी ठाकरेंच्या विरोधात जायला नको होते; पण आता त्यांच्याविरोधात अमोल कीर्तिकर विजयी होतील, असे सरदेसाई म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com