दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच

दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शिंदे गटाकडून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. महाविकास आघाडीतील अंबरनाथ येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यानंतर आता डोंबिवलीतील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे दरेकर यांचा ताप वाढला आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही पुरेसे व्हिटॅमिन दरेकरांना मिळत नसल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढत अर्ज दाखल केला. या रॅलीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी दिसली, तरी ती प्रचाराच्या शेवटपर्यंत टिकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या पक्षांना राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. डॉ. शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरी त्यांनी प्रचाराचा धूमधडाका कधीच सुरू केला आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या मतदारसंघात ऑपरेशन धनुष्यबाण राबवत महाविकास आघाडीतील पक्षांना खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी सात माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश केला. माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशीष डुबली, ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी; तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महाविकास आघाडीला हा धक्का पचवता आला नाही, तोच दुसरा धक्का ठाकरे गटाला मिळाला. लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या‍वेळी काढलेल्या रॅलीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर होते. दरेकर यांनी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड, कल्याण पूर्वेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत पदाधिकारी व कार्यकर्तेच शिल्लक ठेवायचे नाही, अशी खेळी शिंदे गटाकडून खेळली जात आहे. त्यासाठी साम दाम दंड भेद सर्व क्लुप्त्या त्यांच्याकडून वापरल्या जात आहेत. दरम्यान, मतदान अवघ्या २० दिवसांवर आले असताना ठाकरे गटाकडून आता कोणती रणनीती आखली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाराजीचा सूर
एकीकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांची मोठी फळी शिंदे गटात प्रवेश करत आहे, तर दुसरीकडे उमेदवार मनासारखा मिळाला नसल्याने केवळ ठाकरे गटातच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. वैशाली दरेकर या पूर्वाश्रमीच्या कट्टर शिवसैनिक आहेत. त्यां‍ची पक्षप्रमुखांनी उमेदवारीसाठी निवड केली असली, तरी ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीमुळे सेनेतील ज्येष्ठ जाणते शिवसैनिक दरेकर यांच्या प्रचार दौऱ्यापासून दूर असल्याचे दिसते. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही पुरेसे व्हिटॅमिन दरेकरांना मिळत नसल्याने त्यांचा एकाकी प्रचार सध्या सुरू आहे.


लोकशाही टिकवण्यासाठी मैदानात : दरेकर
लोकशाही वाचवण्यासाठी जनता उभी राहिली आहे. भारत एकसंघ राहण्यासाठी आम्ही लढतो. कोणी गेले तरी फरक पडत नाही. जाणाऱ्यांचा आम्ही विचार करत नाही. नाराज कोण हे पाहण्यापेक्षा ही लढाई फार महत्त्वाची असून निर्णायक स्थितीला आली आहे. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे मत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य होत असते. इच्छुकांना पर्याय मिळत असतो. दरेकर यांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. आज ४० आमदार, १३ खासदार, पदाधिकारी गेले, तरी शिवसेना उभी आहे. शिवसेनेला कधी माणसांची, कार्यकर्त्यांची कमतरता जाणवली नाही.
- सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

खोट्या शिवसेनेतून सर्व शिवसैनिकांचा प्रवास खऱ्या शिवसेनेकडे सुरू आहे. नकली सेनेत तर नकली लोकच उरणार आहेत. महाराष्ट्रात धनुष्यबाणावर शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. शिंदे गटाच्या उमेदवार तरी कुठे असली आहेत. त्यांचा प्रवास शिवसेनेतून सुरू होतो, नंतर मनसे आणि पुन्हा शिवसेनेत संपतो.
- दीपेश म्हात्रे, सचिव युवा सेना, शिवसेना शिंदे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com