Labor Day: पालघर जिल्ह्यात वेळेत उपचारासाठी कामगार रुग्णालय हवे

Labor Day: पालघर जिल्ह्यात वेळेत उपचारासाठी कामगार रुग्णालय हवे

पालघर जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना कामगारांनी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षांसाठी मते मांडली आहेत.

कीर्ती केसरकर : सकाळ वृत्तसेवा
बोळिंज, ता. १ : पालघर जिल्ह्यात कामगारांना योग्य त्या सुविधा आजतागायत मिळालेल्या नाहीत. मूलभूत सुविधांपासूनही ते वंचित असतात. त्यामुळे अनेक अडचणीतून त्यांना जावे लागते. त्यांची आर्थिक सुधारणा होणे अपेक्षित आहे. कामगार रुग्णालय, स्वच्छतागृह यांसह वेतनात असलेला फरक, वाहतूक कोंडी आदी अनेक समस्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा कामगार वर्गाकडून केली जात आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना कामगारांनी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षांसाठी मते मांडली आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत लाखो कामगार आहेत. या कामगारांच्या सुरक्षेसाठी आजतागायत उपाययोजना करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी योग्य पावले उचलली नाहीत. त्या‍मुळे अनेक समस्यांना सामारे जावे लागते.

आरोग्य सुविधांची वानवा असल्याने कामगारांना अनेकदा मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. दुर्घटना घडल्यास वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा वेळेस कामगार रुग्णालय जिल्ह्यात असल्यास वेळेत उपचार होऊ शकेल. यामुळे कामगारांनाही सुरक्षिततेची हमी मिळेल. या समस्यांसह कामगारांच्या अनेक प्रश्न आहेत. आगामी सरकारने ते प्रश्न आणि समस्या सोडवल्यास कष्ट करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवे नियम, धोरण केंद्राने आखावे!

ठेकेदार व महापालिका यांच्यात पुरेपूर समन्वय असायला हवा. वेतनाच्या बाबतीत महापालिकाअंतर्गत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेतन वेळेवर न मिळणे; तसेच अनेकदा वेतनात कपात केली जाते. कमी वेतन मिळत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कामगारांना हक्काचे वेतन व सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल. याकडे लक्ष देण्याची गरज असून, प्रशासनाला याबाबतीत नवे नियम व धोरण केंद्राने आखून द्यायला हवे, असे मत या वेळी कामगार साई कूंबा यांनी व्यक्त केले.

अपुऱ्या सुविधांचा त्रास

ज्या काही सुविधा दिल्या जातात. त्या पुरेसे नाहीत. महिलांना कपडे बदलण्यासाठी योग्य जागा नाही. आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दिशेने योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने अतिशय त्रास होत असतो. आदिवासी समाजाकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त भरती करून द्यावी अशी मागणी आहे. रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यातच कामगारांसाठी योग्य ते रोजगार उपलब्ध करावेत, अशी अपेक्षा नरेन मिश्रा या कामगाराने व्यक्त केली.

औद्योगिक वसाहतीत काम करणारे लाखो कामगार आहेत. कामगारांना अनेकदा मोठ्या आजारातून सामोरे जावे लागते. अशा वेळेस उपचार घ्यायचे असतील, तर मुंबईशिवाय पर्याय नसतो. म्हणूनच कामगार रुग्णालय असावे. सर्व उपचार व्यवस्थितरित्या व्हावे, त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात. विमा योजनेचा लाभ नजीकच्या रुग्णालयात मिळावा. यासाठी येणाऱ्या नव्या सरकारने उपाययोजना राबवाव्यात. जेणेकरून कामगाराला सुरक्षिततेची हमी मिळेल.
- नितीन देसाई

मुंबई, ठाणे परिसरातून कामगार पालघरमध्ये कामानिमित्त ये-जा करत असतात. मालवाहतूक करणारी वाहनांची वर्दळ असते. मात्र, सुसज्ज स्वच्छतागृहाचा अभाव निर्माण होत असतो. त्यामुळे महिला कामगारांनाही अडचणी येतात. दिवसा काम करत असतानाच रस्त्यांवर सुसज्ज शौचालय नसल्याने अतिशय त्रास होतो. त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात नवी योजना राबवणे हिताचे ठरेल.
- पवन गायकांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com