आठ वर्षांच्या ‘जलपरी’ची समुद्राला गवसणी

आठ वर्षांच्या ‘जलपरी’ची समुद्राला गवसणी

वसई, ता. १ (बातमीदार) : वय अवघे आठ वर्षे तीन महिने, मात्र समुद्र परिक्रमा करण्याची जिद्द तिने उराशी बाळगली. हिरकणीने जसा किल्ला सर केला, तसाच या जलपरीने समुद्राला बुधवारी (ता. १) गवसणी घातली आणि ३९ मिनिटांत दीड किमी अंतर पार केले. विरारच्या या जलपरीचे नाव आहे उर्वी निनाद पाटील. तिच्या या यशाबाबत कौतुक केले जात असून एका छोट्या मुलीने केलेल्या कार्याची स्तुती होऊ लागली आहे.

विरार येथील अर्नाळा गावात उर्वी पाटील राहते. ती आगाशी येथील जॉन ट्वेंटी थर्ड या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकते. ऐतिहासिक गड-किल्ले पायदळी तुडवण्यासह सायकल चालविण्याची तिला आवड आहे. गावातून ते अगदी महामार्गावर ती प्रवास करते, तिला वडील निनाद पाटील हे साथ देतात. गेल्या तीन महिन्यांपासून क्लब वनचे प्रशिक्षक जावेद सय्यद यांच्याकडे प्रशिक्षण घेत ती सराव करत होती. त्यांनी तिचे पोहण्याची कला सुधारण्यासाठी विशेष मेहनत घेतली. गेल्या चार दिवसांत तिने पूर्ण अर्नाळा किल्ल्याची पाहणी केली आणि समुद्रातदेखील प्रशिक्षण घेतले.

बुधवार (ता. १) उजाडताच तिने समुद्राशी सामना करण्याचे ठरवले. अर्नाळा समुद्रात उडी घेतली. या वेळी सोसाट्याचा वारा तोही उलट्या दिशेने, खारे पाणी तोंडात जात होते, मात्र कोणतीही पर्वा न करता तिने समुद्रकिनारा ते अर्नाळा किल्ला हे दीड किमी अंतर अर्धा तास नऊ मिनिटांत पार केले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत, उर्वीची आई जान्हवी, वडील निनाद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तिचे वडील निनाद यांनी याच समुद्रात २३० परिक्रमा पूर्ण केल्या आहेत, मात्र त्यांच्या मुलीने समुद्राला गवसणी घातल्यावर त्यांना अधिक अभिमान वाटला. समुद्रातून पोहून बाहेर येताच उर्वीच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद दिसून आला.

उर्वीला समुद्रात पोहायचे होते, मात्र तिचे वय कमी असल्याने अथांग सागरात कशी पोहणार, असे मनात येत होते, मात्र तिचा आत्मविश्वास दांडगा होता. ते पाहून आम्ही अर्नाळा समुद्रात पोहण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले आणि उर्वीने उत्कृष्ट नैपुण्य दाखवले, याचा आम्हाला अभिमान आहे.
- जान्हवी पाटील, उर्वीची आई

किल्ल्यापर्यंत पोहत जाणे, हे मुश्किल आहे, यासाठी सराव खूप असावा लागतो. त्यात तिचे वय कमी; परंतु जिद्द मोठी होती. ती पोहताना प्रथम नागरिक म्हणून साक्षीदार होतो. तिने समुद्रालादेखील हरवले आहे. गावातील एका मुलीने साहस दाखवून अनेकांना प्रेरणा दिली आहे, याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. ग्रामपंचायतीतर्फे उर्वीचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
- नंदकुमार घरत, सरपंच, अर्नाळा ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com