बाहेरच्या उमेदवाराने महायुतीची दमछाक (सरकारनामा)

बाहेरच्या उमेदवाराने महायुतीची दमछाक (सरकारनामा)

बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उतरवले आहे. कायदे क्षेत्रातील त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली असली तरी मतदारसंघासाठी नवा चेहरा असल्यामुळे मतदारांशी संवाद साधताना भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
शासकीय वकील म्हणून २६-११ दहशतवादी खटल्यासह अनेक हाय प्रोफाईल खटले लढवून नावलौकिकास आलेल्या उज्ज्वल निकम यांना भाजपने लोकसभेच्या रणसंग्रामात उतरवले आहे. निकम हे मूळचे जळगावचे आहेत, त्यांचा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाशी तसा काही संबंध नाही. त्यामुळे ‘बाहेरचा उमेदवार’ हा शिक्का पुसण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जवळपास १७ लाख मतदार असून त्यामध्ये मराठी, उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मुस्लिमांचे प्राबल्य आहे. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारताना शेवटच्या टप्प्यात उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे. उमेदवारी मिळताच निकमही कामाला लागले. कोण कोणत्या पक्षाचा पदाधिकारी-कार्यकर्ता आहे, कुठल्या भागात कोणाचे प्राबल्य आहे, याची निकम यांना नीट माहिती नसल्याने ओळख करून देणे, स्थानिक समस्या समजावून सांगताना अडचणी येत असल्याची माहिती भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने ‘सकाळ’ शी बोलताना दिली.
------------------------
पदाधिकाऱ्यांच्या खिशाला चाट
निवडणूक काळात उमेदवार एखाद्या विभागात भेट देण्यासाठी जात असेल तर त्यांचे ढोल-ताशा वाजवत फटाके फोडून, हारतुरे देऊन जंगी स्वागत करावे लागते. हा खर्च उमेदवाराच्या खिशातून होतो. मात्र, निकम यांच्याशी परिचय नसल्यामुळे त्यांचे मेळावे, भेटीगाठीची व्यवस्था स्थानिक पदाधिकाऱ्यांना करावी लागते. त्यामुळे खिशाला चाट पडत असल्याचे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
----------------------------
कार्यकर्त्यांना कोण सांभाळणार?
उत्तर मुंबईत भाजप आणि शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, निवडणूक काळात कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. त्यांच्या गरजा पुरव्यावा लागतात. मात्र, उमेदवार नवा असल्यामुळे त्यांच्याकडून पैसे मागायचे कसे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना सतावतो आहे. तसेच पैसे खर्च केल्यास भविष्यात त्याची परतफेड होईल का, याची चिंताही पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.
----------------------------
हॅट्ट्रिकचे आदेश
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ भाजपने सलग दोनदा जिंकला आहे. त्यामुळे येथे हॅट्ट्रिक साधण्याचे आदेश भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, राजकारणाबाहेरील उमेदवार असल्याने संवाद साधताना अडचणी येत असल्याची कबुली कार्यकर्ते देत आहेत.
------------------------------
महाजन गटात नाराजी
पूनम महाजन यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. या ठिकाणी दिवंगत प्रमोद महाजन यांना मानणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची संख्या आहे. नाराजी दूर करून त्यांना कामाला लावण्याचे, त्यासोबत पूनम महाजन यांना प्रचारात उतरवणे, हे भाजपपुढे आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com