अंमली पदार्थांच्या विळख्यात तरूणाई

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरूणाई

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : ठाणे शहरात एमडी आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ होत आहे. त्यासोबतच ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय वाढत असल्याची चिंता ठाणे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहेत. पोलिसांनी नुकताच आजमगड येथे जाऊन अमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला, त्याची माहिती देत असताना अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच पालकांनी सजग राहण्याचेही आवाहन त्यांनी केले.

ठाणे पोलिस तस्करांचा बंदोबस्त करण्यास सज्ज आहे. तर पालिकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे शिवराज पाटील यांनी म्हटले. यंदाच्या वर्षी जानेवारीत ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरडे ठाणे पोलिसांनी मोडले. तर तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन केली होती. त्यांच्या आदेशानुसारही ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करीत अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी यावर्षी केलेल्या कारवाईत गांजा, एमडी, चरससारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींना गजाआड करून तब्बल सहा किलो गांजा, १३६ ग्रॅम मेफेड्रोन, चार किलो ८५० ग्रॅम चरस असा ३६ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर १४ आरोपींना तस्करी करताना मुद्देमालासह अटक केली होती. तर गांजाची तस्करी आणि विक्रीप्रकरणी पाच गुन्हे, मेफेड्रोन विक्रीप्रकरणी दोन गुन्हे, तर चरस विक्रीप्रकरणी एक गुन्हा असे नऊ गुन्हे दाखल करून १४ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांची झाडाझडती सुरू
नव्या वर्षात ठाणे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर अनेक तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यासोबतच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निर्जनस्थळी बंद पडलेल्या कंपन्या, तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. जानेवारीत ठाणे पोलिसांनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तब्बल ४७५ जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तस्करांसोबत अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचीही भंबेरी उडाली असून अमली पदार्थांच्या तस्करीला बऱ्याच प्रमाणात चाप बसला आहे. आजही प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्तव्यावरील गस्ती पथके ही निर्जनस्थळे, बंद कंपन्या, पडकी घरे आदी ठिकाणी गस्ती घालून अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

पालकांनी तरुण मुलांकडे विशेष लक्ष द्यावे
अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना चांगले यश मिळाले आहे. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाखल गुन्ह्याच्या धागेदोरे पकडून चक्क अमली पदार्थ एमडीचे दोन कारखाने उद्ध्वस्त करून कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची तस्करी जोर धरत होती. तर सेवन करणाऱ्यांची संख्याही विलक्षण वाढल्याची कबुली दिली. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ठाणे पोलिस सक्षम आहे. मात्र, सेवन करणाऱ्या तरुणांना या नशेपासून दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपला मुलगा कुठल्या पार्टीला जातो, काय सेवन करतो. तसेच शाळा- महाविद्यालयाच्या शेजारी होणाऱ्या गैरकृत्यावर शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य केले, तर नक्कीच अमली पदार्थ तस्करीही रोखता येईल, यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
-शिवराज पाटील, ठाणे पोलिस उपायुक्त (गुन्हे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com