नेरूळ येथील कांदळवनाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

नेरूळ येथील कांदळवनाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

नेरूळ येथील कांदळवनाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
वाशी, ता. १ (वार्ताहर)ः पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ भागातील पाणथळ क्षेत्रात अनधिकृत राडारोडा टाकून भराव टाकण्याचे काम सुरू असल्याची तक्रार स्थानिक पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली होती. या तक्रारीनंतर संबंधित अधिकारी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून या जागेची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर सदर जमीनमालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पाणथळ भाग संरक्षित असतानादेखील सीवूड येथील एनआरआय परिसरातील पाणथळ भागात अनधिकृत राडारोडा टाकण्यात येत आहे. त्याचा परिणाम तलावात नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर झालेला आहे. येथील नाले राडारोडा टाकल्याने बुजण्याच्या स्थितीत आले आहेत. त्याचप्रमाणे परिसरात कांदळवनांची कत्तल सुरू असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात पर्यावरणवादी कार्यकर्ते सुनील अग्रवाल आणि ॲड. प्रदीप पाटोळे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे तहसीलदार दिनेश पैठणकर, बेलापूर मंडल अधिकारी सुरेश रोकडे, बेलापूरचे तलाठी ईश्वर जाधव, वन विभागाचे महेंद्र गीते व संदीप रोकडे, महापालिका मँग्रोव्ह सेलचे पदाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून एनआरआय संकुलालगतच्या भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान महापालिकेने टी. एस. चाणक्य तलावाशेजारील सोलर लाईट आणि राडारोडा आधीच हटविल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. एनआरआय संकुलाजवळील भागाची पाहणी केल्यानंतर तहसीलदार दिनेश पैठणकर आणि बेलापूर मंडल अधिकारी सुरेश रोकडे यांनी कांदळवने नष्ट केल्याप्रकरणी जागामालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
...........................
सिडको व वनविभागाने हा पाणथळ परिसर कांदळवन विभागाकडे द्यावा आणि महापालिकेने त्याची देखभाल करावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी जमीनमालकांवर गुन्हा दाखल करण्याची घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून ही कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, अशी आम्हा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
- सुनील अग्रवाल, पर्यावरणवादी कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com