महायुतीचे नाशिकमध्ये आज शक्ती प्रदर्शन

महायुतीचे नाशिकमध्ये आज शक्ती प्रदर्शन

गोडसे-पवार आज अर्ज दाखल करणार, दिग्गजांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघांत शिवसेनेच्या दोन्ही गटांत लढत होईल. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडणूक लढवत आहेत, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गोडसे व पवार या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांकडून गुरुवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------
५० हजार कार्यकर्त्यांचे नियोजन

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्या शक्तिप्रदर्शनाला तोडीस तोड देण्याचा भाग म्हणून महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. पन्नास हजार कार्यकर्ते आणण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------
शक्तिप्रदर्शनातून उत्तर

महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन ४५ दिवस झाले, मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाही. १ मे रोजी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. प्रथम जागा निश्चिती व त्यानंतर उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाल्याने महायुतीबद्दल नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये नकारात्मक वारे वाहू लागले. विरोधकांकडूनदेखील तसा प्रचार सुरू झाला, त्याला उत्तर देण्याचा भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे महायुतीचे नियोजन आहे.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com