गुजरातची भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय

गुजरातची भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय

गुजरातच्या भरभराटीसाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय
- जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १ : महाराष्ट्र कोणी हातात आणून दिलेला नाही, अनेक हुतात्मे यासाठी शहीद झालेत. महाराष्ट्र हा पोवाड्यांनी गाजला, डफावर मुंबई पेटवली. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, पण आज गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही टप्प्यांत किती मतदान झाले याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली असून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटदेखील केले आहे. पहिल्या टप्प्यानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यानंतर ४ दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. निवडणूक आयोगाने इतका उशीर का केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व संशयास्पद आहे, ईव्हीएमबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोग मतदानाचा आकडा का देत नाही? टक्केवारीच का देते, असा प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी जे काही बोलतोय, दाखवतोय ते पुराव्यानिशी दाखवत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. हिंदुत्वाचा त्यांचा मार्ग फेल गेला आहे. इतर देशांत लोकशाहीबद्दल राज्यकर्त्यांना चिंता असते, मात्र इथे काहीच नसून निवडणूक आयोग कठपुतली असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

...
निवडणूक आयोगाकडून दुजाभाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे, यावर मला काही बोलायचे नाही. शरद पवार हा माझा बाप असल्याचे आव्हाड म्हणाले. ठाण्यात आमचे सर्व फोटो झाकले गेलेले आहेत, मात्र अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे फोटो झळकत आहेत, निवडणूक आयोग दुजाभाव करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला.


...
मफतलालच्या जागेवर झोपड्या बांधण्याचा घाट
कळवा येथील मफतलाल कंपनीच्या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या ठिकाणी भरणी केली जात असून तिथे झोपड्या बांधण्याचा घाट घातला जात असल्याची बाब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्याची तयारी केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

न्यायालयाच्या आदेशानंतर मफतलालची उर्वरित जमीन वाचविण्यासाठी याठिकाणी भिंत बांधण्यात आली. ही जमीन विकून कामगारांची देणी द्यावीत, असे न्यायालयाचे म्हणणे होते. या कंपनीमध्ये सुमारे ३ हजार लोक कामाला होते. त्यापैकी १५०० कामगार मृत झाले असून त्या मृत कामगारांचे २५० कोटी देणे बाकी आहे. गेली ३० वर्षे न्यायालयात खटला चालू आहे. अनेक कामगार देशोधडीला लागले आहेत. ही जमीन न्यायालयाने कशीबशी वाचवून ठेवली होती. न्यायालयाने या ठिकाणी भिंत घालून जमीन मफतलालच्या ताब्यात दिली. मात्र याठिकाणी भरणी केली जात असून ही बाब ठाणे पालिकेच्या लक्षातच येत नाही? ठाणे हे अनधिकृत बांधकामांचे माहेरघर आहे का, असा सवालदेखील आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com