सीएसएमटी स्थानकात पुन्हा त्याच ठिकाणी लोकल घसरली

सीएसएमटी स्थानकात पुन्हा त्याच ठिकाणी लोकल घसरली

लोकल पुन्हा घसरली!
सीएसएमटी स्थानकात अपघात; प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : सीएसएमटी रेल्वेस्थानकादरम्यान आज पुन्हा एकदा लोकल ट्रेन रुळावरून घसरली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सीएसएमटी दिशेकडील वाहतूक पूर्णपणे कोलमडल्याने सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. तीन दिवसांत दुसऱ्यांदा लोकल घसरल्याने मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २९) सीएसएमटी रेल्वेस्थानकांदरम्यान डाऊन हार्बर मार्गावर लोकल घसरल्याची घटना घडली होती. त्यात अपघातग्रस्त विभागामधील रेल्वेने बुधवारी दुपारी १.३० वाजता मेगाब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. ब्लॉक संपल्यानंतर ट्राय रन म्हणून सीएसएमटीकडे एक रिकामी लोकल चालविण्यात आली; परंतु लोकलच्या एका डब्याची दोन चाके रेल्वे रुळावरून घसरली. ही घटना संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी घडली. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच, मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुळावरून घसरलेल्या लोकल ट्रेनचे चाक पुन्हा रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. यादरम्यान सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वडाळा स्थानकात थांबवल्या जात होत्या. रात्री उशिरापर्यंत हार्बर मार्गावरील २५ पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाणारी लोकल रुळावरून घसरली होती. त्याच ठिकाणी आज दुपारी लोकल घसरल्याची घटना घडली. देखभाल-दुरुस्ती करूनसुद्धा लोकल रुळावरून घसरत असल्याने रेल्वेच्या देखभाल- दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
...
सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांचे हाल
कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने रेल्वे प्रशासनाने बुधवारी रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने अगोदरच मुंबईकरांचे हाल झाले आहे. त्यात लोकल अपघातामुळे सीएसएमटी ते वडाळा लोकल सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. हार्बर मार्गावरील लोकल सेवा वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीच्या प्रवासासाठी पनवेल, बेलापूर मार्गस्थ करण्यात आल्या आहे. त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले आहे.
...
लोकल पुन्हा रुळावर
रुळांवरून खाली घसरलेली चाके रुळांवर पुन्हा चढविण्यासाठी संध्याकाळचे साडेसहा वाजले. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी घसरलेली रिकामी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आणण्यात आली. त्यानंतर लोकल कारशेडला रवाना करण्यात आली. रात्री ८ वाजल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सुरू झाल्या; परंतु १५ ते २० मिनिटे लोकल उशिराने धावत होत्या.
...
मुख्य मार्गाला फटका
या अपघाताचा परिणाम मुख्य मार्गावरदेखील झाला. कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने सीएसएमटीकडे येणारी वाहतूकदेखील रखडत सुरू होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून पनवेल लोकल चालविण्यात आल्या; परंतु यामुळे मुख्य मार्गावरील वेळापत्रक विस्कळित झाले.
...
रेल्वे रुळावरून घसरल्याच्या घटना
- जून २०२३ - अंबरनाथ येथे डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना
- फेब्रुवारी २०२३ - खारकोपर स्थानकानजीक बेलापूरहून खारकोपर स्थानकाकडे जात असताना लोकलचे तीन डबे रुळावरून घसरण्याची घटना
- जुलै २०२२ - सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलच्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरल्याची घटना
- सप्टेंबर २०२१ - नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे मालगाडीचा एक डबा शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून खाली उतरल्याची घटना
- सप्टेंबर २०२१ - लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना
- ऑगस्ट २०१५ - कल्याणजवळ दोन वेळा लोकल रुळावरून
घसरण्याच्या घटना
- मे २०१४ - मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात घोडाडोंगरी येथे मालगाडीच्या वॅगन रुळावरून घसरली
- मे २०१४ - महिन्यात कोकण रेल्वेमार्गावर रोह्याजवळ रेल्वे घसरल्याने १९ जणांना प्राणास मुकावे लागले होते; तर तब्बल १०० जण जखमी झाले होते.
- मार्च २०१३- वडाळा रोड रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशाने टाकलेल्या कपड्यांच्या गाठोड्यांमुळे हार्बरवर मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा एक डबा रुळावरून घसरण्याची घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com