झोपडपट्टीला हायप्रोफाईल ग्लॅमरची प्रतीक्षा

झोपडपट्टीला हायप्रोफाईल ग्लॅमरची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : वांद्रे पश्चिम विधानसभा म्हटले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो पाली हिल, बँड स्टँड, कार्टर रोडचा हायफाय एरिया आणि येथे असलेले सेलिब्रिटी; पण याच विधानसभा क्षेत्रात वांद्रे गावठाण, नर्गिस दत्त नगर, माऊंट मेरी परिसर, चिंबई, खार पश्चिम, खार दांडा हा दाटीवाटीने वसलेला झोपडपट्टीचा परिसर आहे. एकबाजूला हायफाय सुविधा तर दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांची वानवा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या झोपडपट्टी परिसराला हायप्रोफाईल ग्लॅमर कधी येणार, आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असे सवाल येथील रहिवाशांकडून व्यक्त केले जात आहेत.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्वात चर्चेत असणार विधानसभा मतदारसंघ म्हणून वांद्रे पश्चिमकडे पाहिले जाते. पाली हिलची उच्चभ्रू लोकवस्ती आणि सेलिब्रिटी, सिनेकलाकार यांचे वास्तव्य येथे आहे. त्यामुळे वांद्रे स्थानक ते अगदी समुद्रापर्यंत असलेल्या या परिसरात सर्व सुविधा असून रस्ते मोठे आहेत. दुसरीकडे मात्र नर्गिस दत्त नगर, वांद्रे गावठाण, खार पश्चिमेकडील झोपडपट्टीत नवख्या माणसाला धड जाताही येत नसल्याची परिस्थिती आहे. तसेच हा भाग उंचावर असल्याने रहिवाशांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाली हिलप्रमाणे आम्हालाही चांगले दिवस कधी येणार, असा सवाल रहिवासी करीत आहेत.
वांद्रे पश्चिमेकडे अनेक सेलिब्रिटी आणि हायप्रोफाईल लोक वास्तव्याला असल्याने त्यांची नेहमीच ये-जा असते. त्यांचा ताफा जाण्यासाठी अनेकदा वाहतूक रोखून धरली जाते. तसेच मेट्रोच्या कामामुळे रहिवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
-------------------
सीआरझेडमुळे पुनर्विकासाला खीळ
खार पश्चिमेकडील झोपडपट्टी, खार दांडा हा परिसर सीआरझेडमध्ये येतो. त्यामुळे येथील रहिवाशांना आपल्या घराचे काम करायचे असल्यास किंवा झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवायची असेल तर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे येथील पुनर्विकासाला खीळ बसली आहे. परिणामी, परिसरातील अनेक घरे मोडकळीस आली असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-----------
प्रमुख समस्या
झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न
उंचावरील भागातील पाणीटंचाई
वांद्रे रिक्लेमशन, बँड स्टँडच्या परिसरात येणाऱ्या जोडप्यांमुळे बिघडणारी कायदा सुव्यवस्था
खार परिसरात पालिका रुग्णालय नसल्याने रहिवाशांची गैरसोय
--------------------------
२०१९ मधील स्थिती
विजयी उमेदवार - पूनम महाजन
वांद्रे पश्चिममधून मिळालेली मते - ७९ हजार २४२ मते
पराभूत उमेदवार - प्रिया दत्त
--------------------------
वांद्रे स्थानकाला लागून असलेली झोपडपट्टी आणि माऊंट मेरी परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वर्षांनुवर्षे असलेला हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.
- रॉड्रिक फर्नांडिस, रहिवासी
…..
सीआरझेडमुळे खार दांडा परिसरातील पुनर्विकास रखडला आहे. त्याला चालना देणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
- सुरेश पाटील, रहिवासी
….
वांद्रे विधानसभेतील नागरी प्रश्न मार्गी लागणाऱ्या सक्षम उमेदवाराला मतदान करणार आहे.
- जीवन यादव, नवमतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com