रहिवाशांनी मांडला समस्यांचा लेखाजोखा

रहिवाशांनी मांडला समस्यांचा लेखाजोखा

घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीत सगळेच पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रकाशित करून ते सोडविण्याचे आश्वासन मतदारांना करत आहेत तर दुसरीकडे मतदान करणाऱ्या जागृत नागरिकांनी आता स्वतःच आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचा लेखाजोखा उमेदवार यांच्यासमोर मांडला आहे. चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या स्थानिक सदस्यांनी चांदिवली परिसरात भेडसावणाऱ्या विविध समस्या जाहीरनाम्यात मांडल्या आहेत. जे उमेदवार आमच्या समस्या सोडवण्यावर भर देतील त्यांनाच आम्ही मतदान करू, असा निर्धार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांदिवलीतील रहिवाशांनी केला आहे.
चांदिवली विधानसभेत वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता या समस्या उग्र स्वरूप धारण करत आहेत. साकीनाका जंक्शन, कुर्ला ते साकीनाकादरम्यान होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रस्त्यारस्त्यावर पडलेला कचरा आणि त्यामुळे परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीचा सामना येथील रहिवासी करत आहे. तसेच चांदिवलीतील भट्ट्या आणि रेडी सिमेंटच्या प्लांटमुळे होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. चांदिवलीत बऱ्याच झोपड्या या डोंगराळ भागात येत असल्याने येथे उंच डोंगरावरून मातीचे भूस्खलन होणे, दरड कोसळणे असे प्रकार पावसाळ्यात घडत असतात. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी उमेदवाराने पुढाकार घ्यावा, अशी मागणी चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
चांदिवलीतील नागरिकांच्या समस्या जे उमेदवार सोडवतील त्यांचा आम्ही विचार करू आणि मतदान करू, असा निर्णय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी घेतला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना तर भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हे उमेदवार चांदिवली विधानसभेतील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याच्या चर्चेत सहभागी होऊन नागरिकांना आश्र्वासित करतात का, हेच पाहावे लागेल.
….

असा आहे रहिवाशांचा जाहीरनामा

१) वाहतूक कोंडी : डीपी योजनेनुसार डीपी रस्त्यांची अंमलबजावणी करण्यात अपयश
२) बेकायदेशीर भट्ट्या आणि रेडी मिक्स सिमेंट प्लांटमधून होणारे वायू प्रदूषण
३) उंच इमारतींच्या परिसरात असलेले मिनी फायर स्टेशन कुचकामी आहे
४) परिसरात झळकणारे बेकायदेशीर होर्डिंग्ज
५) फूटपाथ आणि रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
६) उघड्यावर कचरा टाकून होणारी दुर्गंधी
७) सहकारी गृहनिर्माण संस्थांवर आकारला जाणारा जीएसटी रद्द करणे किंवा दुरुस्त करणे
८) सार्वजनिक उद्यानांची देखभाल न करणे आणि मोकळ्या जागांचे अतिक्रमण
९ ) रहिवासी भागाजवळ उभ्या केलेल्या ट्रक आणि बससारख्या अवैध अवजड वाहनांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

….
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईकडून मोठ्या प्रमाणात महसूल सरकारला जात असतो. मात्र, ज्या सुविधा आम्हाला पाहिजेत त्या मात्र मिळत नाहीत. त्यामुळेच निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना आम्हीच आमचा जाहीरनामा देऊन आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडत आहोत. जे आमच्या समस्या सोडवतील त्यांचा आम्ही नक्कीच विचार करू.
- मनदीप सिंग मक्कर, संस्थापक चांदिवली सिटिझन वेल्फेअर असोसिएशन
...
चांदिवली परिसरात दूषित हवा, वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेला कचरा, चालण्यास अपुरे रस्ते, रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्वरित सोडवल्यास आमचे जगणे सुसह्य होईल.
- अशोक प्रधान, ज्येष्ठ नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com