प्रचार रॅलीमुळे डोंबिवलीकर बेहाल

प्रचार रॅलीमुळे डोंबिवलीकर बेहाल

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालय गाठत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (ता. २) महायुतीने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहरात पुन्हा कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. या प्रचार रॅलीमुळे डोंबिवलीकर पुन्हा एकदा खोळंबले होते. त्यातच सूर्यनारायणाचा प्रकोप होत असल्याने गरमीने डोंबिवलीकर बेहाल झाले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गुरुवारी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीने रॅली काढली होती. या रॅलीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. आधीच उन्हाच्या कडक झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यात या उन्हाच्या झळा सहन करत अर्धा-अर्धा तास कोंडीत ताटकळत उभे राहावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ऐनवेळी बदल केले आहेत. घरडा सर्कल येथे वाहनांना प्रवेशबंदी असल्याने चालकांना मोठा वळसा घालावा लागत आहे.

वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाकडून निवडणूक कार्यालयाजवळील रस्त्यांवर वाहतूक बदल केले आहेत; मात्र स्टेशन परिसरातील अरुंद आणि मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या कोंडीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, चार रस्ता, टिळक चौक, मंजूनाथ शाळा रोड, शेलार नाका ते शिवम हॉस्पिटल या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच रॅलीत सहभागी होण्यासाठी बसमधून कार्यकर्ते, नागरिक आले होते. त्यांच्या बसदेखील या कोंडीत अडकून पडल्या होत्या.

नागरिकांची पायपीट
वाहतूक पोलिसांच्या नियोजनाच्या अभावी डोंबिवलीकरांना कोंडीचा ताप सहन करावा लागत आहे. स्टेशन परिसरातील रिक्षा बंद ठेवल्याने रिक्षा मिळवण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत होती.
रॅलीदरम्यान वाहतूक कोंडी होऊन एक रस्ता पूर्ण ब्लॉक झाल्याने रिक्षाचालकदेखील दुपारी जवळचे प्रवासी भाडे नाकारत होते. स्टेशन परिसर, पेंढारकर कॉलेज, घरडा सर्कल आदी ठिकाणी जाण्यास नकार देत होते.

या ठिकाणी कोंडी
रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनादेखील रॅली संपल्यावर स्टेशन तसेच घर गाठण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याने त्यांना चालतच जावे लागले. लग्नाच्या तिथी असल्यानेदेखील नागरिक घराबाहेर पडले; पण लग्नस्थळी जाण्यासाठी वाहने मिळत नसल्याने नागरिकांना भर उन्हात चालत जावे लागत होते. शहरात टिळक चौक, मंजुनाथ शाळा आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणी कोठेही वाहतूक पोलिस नव्हते. घरडा सर्कल येथे मात्र वाहतूक पोलिसांची मोठी गर्दी दिसून आली. घरडा सर्कल, बंदिश पॅलेस येथे वाहनांना बंदी घालण्यात आल्याने वाहनचालकांना एमआयडीसी परिसरातून वळसा घालून डोंबिवलीत यावे लागत होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

नियोजनाचा अभाव
कल्याण लोकसभा निवडणुकीत उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत १९ उमेदवार, प्रतिनिधींना २८ नामनिर्देशपत्र वाटप केले आहेत. तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन करत भव्य अशी रॅली काढली होती, त्यावेळीदेखील पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.

६ मेपर्यंत वाहतुकीत बदल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी येत्या ६ मेपर्यंत डोंबिवलीतील वाहतुकीत काही बदल केले आहेत. त्यानुसार घरडा सर्कलकडे येणारे रस्ते सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. डोंबिवली पूर्व एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. याठिकाणी उमेदवार अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने कोंडी होऊ नये, यासाठी घरडा सर्कलकडे येणारे रस्ते सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार असून चालकांना पर्यायी मार्गाने जाण्याची सूचना वाहतूक विभागाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com