महायुतीचे शक्तीप्रर्दशन

महायुतीचे शक्तीप्रर्दशन

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निघणाऱ्या रॅलीत सहभागासाठी सकाळी ८ वाजल्यापासून शहरात शिवसैनिकांची लगबग सुरू झाली होती. उन्हाचा पारा चढत असला तरी कल्याण, दिवा, कळवा, मुंब्रा, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, कल्याण ग्रामीणचा पट्टा, १४ गावे आदी भागांतून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. डोंबिवलीच्या ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात खासदार शिंदे यांनी दर्शन घेतल्यानंतर अर्ज भरण्यासाठी मार्गस्थ झाले. रॅलीत ढोल-ताशांचा गजर, झांज लेझीमचे पथक यांसह आदिवासी तारपा नृत्य, पंजाबचा भांगडा, दक्षिण भारतातील कुचीपुडी कलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण केली गेली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे उपस्थित होते.
--------------------------------------------------
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशीर्वादाने कल्याण लोकसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
----------------------------------------------------
संपूर्ण राज्यात महायुतीची लाट आहे. विदर्भात कडाक्याच्या उन्हातदेखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. दहा वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.