सेन्सेक्समध्ये १२८ अंशांची वाढ

सेन्सेक्समध्ये १२८ अंशांची वाढ

मुंबई, ता. २ : अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर जैसे थे ठेवल्याने आज (ता.२) जगभरातील शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारांमध्येही थोडी तेजी आली. आज सेन्सेक्स १२८.३३ अंश तर निफ्टी ४३.३५ अंश वाढला.

फेडरल बँकेने जैसे थे धोरण स्वीकारल्याने जगभरात सर्वत्र सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्समध्ये सुरुवातीला तोटा झाल्यानंतरही  बाजाराने नफा दाखवला. मात्र,आज सेन्सेक्सला ७५ हजारांना स्पर्श करता आला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ७४,६११.११ अंशावर तर निफ्टी २२,६४८.२० अंशांवर स्थिरावला.

आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक विशिष्ट टप्प्यातच फिरत होते. तर वाहननिर्मिती क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीच्या अंदाजांमुळे त्या क्षेत्राकडे सर्वांचे लक्ष गेले व त्यांच्यातही खरेदी झाली. आज बँक आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र किंचित घसरले होते. पण धातूनिर्मिती कंपन्या, वाहननिर्मिती कंपन्या, ऊर्जानिर्मिती कंपन्या, ऑइल अँड गॅस ही क्षेत्रे एक टक्का वाढली होती.

आज बीएसईवर पॉवरग्रीड चार टक्के वाढला, तर एशियन पेंट तीन टक्के वाढला आणि टाटा मोटर दोन टक्के वाढला. एनटीपीसी, टाटा स्टील, महिंद्र आणि महिंद्र, टीसीएस, सनफार्मा, एचडीएफसी बँक या शेअरचे भावही वाढले. तर दुसरीकडे कोटक बँक तीन टक्के घसरला. ॲक्सिस बँक दीड टक्का, एअरटेल सव्वा टक्का, विप्रो आणि आयसीआयसीआय बँक एक टक्का घसरले.
............................
रुपया तीन पैसे घसरला
कच्च्या तेलाची भाववाढ आणि अमेरिकी डॉलर मजबूत झाल्यामुळे आज भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तीन पैसे घसरून ८३.४६ वर बंद झाला. मात्र, शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असल्यामुळे तसेच परदेशी गुंतवणुकदारांचा निधी भारतात आल्यामुळे रुपया फार पडला नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. आज रुपयाचे व्यवहार ८३.४१ वर सुरू झाले. दिवसभरात त्याने ८३.४९ चा नीचांक गाठला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com