दुभंगलेली मैत्री पुन्हा जुळू लागली

दुभंगलेली मैत्री पुन्हा जुळू लागली

दुभंगलेली मैत्री पुन्हा जुळू लागली
मनसेचे नेते महायुतीच्या प्रचारात

दिनेश चिलप मराठे : सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. २ : लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविता महायुतीला मदत करण्याचे ठरविल्याने मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, रिटा मकवाना, संजय नाईक, अविनाश जाधव आदी मातब्बर नेते मुंबईतील सहाच्या सहा लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना मनसेच्या मतांची रसद देण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन प्रचारात कार्यरत झाल्याचे दिसत आहे.
दक्षिण मुंबईत लोकसभेच्या रिंगणात शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही तुल्यबळ पक्षांत लढत होत असल्याने दोन्ही बाजूच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्के वैरी असलेले मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदारपदाच्या उमेदवार आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्यासोबत आल्याने दक्षिण मुंबईचे वातावरण अचानक बदलले आहे. दोन्ही बाजूंच्या नेते आणि कार्यकर्त्यांतील दुभंगलेली मैत्री पुन्हा जुळू लागल्याचे गिरगाव, माझगाव आणि शिवडीत पाहायला मिळत आहे. आता मनसेचे नेते प्रत्यक्षात प्रचाराच्या रणनीतीत सहभागी झाल्याने आपसूकच यामिनी जाधव यांची ताकद वाढू लागल्याने विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना त्यांची प्रचाराची रणनीती बदलावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी एकमेकांविरोधात ठाकलेले शिवसेनेचे यशवंत जाधव आणि शिवसेनेतून मनसेत गेलेले माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर आणि भायखळा येथून यशवंत जाधव यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले संजय नाईक हे दोन्ही मातब्बर नेते आपली सर्व ताकद यामिनी जाधव यांच्या विजयासाठी लावत असल्याने आता निवडणुकीला खरी रंगत आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com