अपहरण केलेल्या बाळाची बिहारमधून सुटका

अपहरण केलेल्या बाळाची बिहारमधून सुटका

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या उल्हासनगरातील महिलेच्या आजारी चिमुकल्या मुलावर मोफत औषधोपचार करण्याचे प्रलोभन दाखवून त्याला हैदराबादमध्ये नेले; मात्र या चिमुकल्याला पुन्हा सोपवण्यास नकार देणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिने हा चिमुकला बिहारमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे या चिमुकल्याला बिहारमध्ये विकले तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली होती; मात्र या मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक निकिता भोईघर यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

मीना सोनवणे या महिलेला पाच मुले असून तिचा पती मिळेल ते हातमजुरीचे काम करतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मीना ही झुलेलाल मंदिराच्या बाहेर बसून भीक मागून उदरनिर्वाह चालवते. मीनाचा सर्वात लहान मुलगा कार्तिक हा पाच महिन्यांचा आहे. त्याच्या गंभीर आजाराचे निदान फेब्रुवारी महिन्यात झाले होते. तिने कार्तिक व मध्यवर्ती हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डचा फोटो व्हाॅट्सॲपवर अपलोड करून त्याच्या औषधोपचाराकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

काही दिवसांनंतर बोरिवली येथे टाटा हाऊसमध्ये राहणारी स्वाती सहदेव बेहरा या महिलेच्या मोबाईलवरून मीनाला फोन आला. त्यावेळी तिने ओळखीच्या हैदराबाद येथील डॉक्टरांची माहिती दिली. स्वातीने मीना ही ज्या ठिकाणी भीक मागते तिथे येऊन तिची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर स्वाती बेहरा हिच्यासोबत १२ फेब्रुवारीला बोरीवलीतून मीना, तिचा पती आणि आजारी मुलगा कार्तिक असे ट्रॅव्हल्सने नामपल्ली स्टेशन हैद्राबाद येथे गेले. हैदराबाद येथे गेल्यावर स्वाती बेहरा हिने तेलंगणामधील कागद रोड येथे राहणारी कृष्णाताई वेणी हिची भेट घडवून आणली. तिथे कृष्णाताई हिने कार्तिकच्या उपचाराचे दोन लाख रुपये डॉक्टरकडे भरल्याचे सांगितले. कृष्णाताईने मीना आणि तिच्या कुटुंबीयांची राहण्याची सोय हैदराबाद येथील अबीर पेठमधील एका लॉजवर केली होती.

व्हिडीओ कॉलद्वारे पाठपुरावा
दुसऱ्याच दिवशी स्वाती बेहरा आणि तिची एक मैत्रीण लॉजवर आले. डॉक्टरची वेळ घेतल्याचे सांगून कार्तिकला सोबत घेऊन गेले. एक दिवस झाल्यावर कार्तिकला परत न आणल्याबाबत मीनाने विचारणा केली असता कमीत कमी एक महिना कार्तिकवर उपचार चालणार आहेत. उपचाराचा सर्व खर्च हा कृष्णाताई उचलत असल्याचे सांगितल्यावर त्यावर विश्वास ठेवत आणि घरी चार लहान मुले व वयस्कर सासू असल्याने मीना आणि तिचा पती हे घरी परतले. मीना ही नियमित कृष्णाताई व स्वाती बेहरा यांच्याबरोबर फोनवरून संपर्कात राहून कार्तिकच्या तब्येतीची विचारपूस करीत होती. व्हिडीओ कॉल करून पाठपुरावा करत होती. त्यानंतर एक महिना पूर्ण झाल्यावर मीनाने कृष्णाताई व स्वाती बेहरा यांना फोन करून कार्तिकवरील औषधोपचार पूर्ण झाले असतील तर आमच्याकडे परत आणून द्या, आम्ही तिकडे घेण्यासाठी येतो, असे म्हटल्यावर त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या. तसेच कृष्णाताई हिने थेट उपचारासाठी दिलेले दोन लाख रुपये द्या, मग कार्तिकला देते, असे सांगत कार्तिकला परत करण्यास नकार दिला.

आरोपी महिलेला पोलिस कोठडी
मीनाला अज्ञात कारणासाठी कार्तिकचे अपहरण झाल्याची खात्री पटल्यावर तिने उल्हासनगर पोलिस ठाण्यात दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हणे, पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी पथकाला मार्गदर्शन करीत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हैदराबादला गेलेल्या पोलिस पथकाच्या हाती कृष्णाताई लागली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तिने दिलेल्या माहितीनुसार अपहरण केलेला मुलगा कार्तिक हा बिहारमध्ये असल्याचे तिने सांगितले, त्यानुसार पोलिस बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील भाकरपूर या गावाकडे रवाना झाले. हा नक्षलग्रस्त भाग असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मालादेवी राजक या महिलेला सापळा रचून अटक केली. तसेच अपहरण झालेल्या बाळाला सुखरूप ताब्यात घेऊन तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com