दिव्यात मतदानाचा टक्का घसरणार?

दिव्यात मतदानाचा टक्का घसरणार?

दिवा, ता. १२ (बातमीदार) : कल्याण लोकसभामधील सहा विधानसभेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दिवा शहरात मतदान जनजागृतीकडे पालिका प्रशासन आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाचे लक्ष नसल्याचे दिवावासीयांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीत ७५ टक्के मतदान व्हावे म्हणून प्रशासनाने ढोल जरी बडवला असला तरी वास्तविक दिव्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून स्वीपअंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, समाज माध्यम, आशासेविकांकडून मतदान जागृती, पथनाट्य, शपथ, फ्लॅश मॉबद्वारे तरुणांची मतदान जागृती, मतदान यंत्रांच्या प्रतिकृती असलेल्या मॅस्कॉटमार्फतही जागृती होत आहे. प्रशासनाकडून मतदारांपर्यंत पोहोचून अशा प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. परंतु दिव्यासारख्या सुशिक्षीत शहराकडे प्रशासन पाठ दाखवत मतदान वाढीसाठी कुठलाही प्रयत्न केला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात दिवा शहरही येते, याचा विसर पालिका प्रशासन किंवा जिल्हा निवडणूक आयोगाला झाला असावा, अशी दिवावासीयांमध्ये चर्चा आहे. कचऱ्याच्या घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून ''मतदारराजा जागा हो'' हा संदेश दिव्यात कुठेच पोहोचला नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. दिवा शहर, तसेच आजूबाजूच्या इतर गावांमध्येही मतदान जागृती होत नसल्याने हे ठाणे महापालिकेत येत नाही का? असा सवाल स्थानिक करत आहेत. प्रशासनाने जनजागृती केली नसल्याने निवडणुकीच्या दिवशी दिवा शहरात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समस्यांचा विळखा
डोंबिवलीनंतर दिवा रेल्वे स्थानक हे गर्दीचे स्थानक म्हणून बघितले जाते. दिवावासियांचा जीवघेणा रेल्वे प्रवास, प्रचंड वाहतूक कोंडी, अनेक वर्ष न सुटलेला पाणीप्रश्न, कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस, मेलला दिव्यात थांबा नसणे, वाढती शेअर रिक्षांची भाडी, अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या प्रमाणामुळे दिव्याची वाढती लोकसंख्या, यामुळे दिव्यात पालिकेच्या मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर येणारा प्रचंड ताण या कारणास्तव दिवावासीय प्रचंड नाराज आहेत. हे प्रश्न अनेक वर्षांपासून सुटले नसल्याने मतदारांची नाराजी कशी दूर होईल, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

आठवड्यावर मतदान आले आहे. दिव्यातील कोणत्याही गावात वा मुख्य शहरात मतदानावर जागृती झालेली नाही. प्रत्येक वेळी मतदानासाठी आम्हाला लांबच्या बुथवर जावे लागते. दिवा पूर्वेतील बेडेकर भागात राहत असलो, तरी माझे बुथ हे दिवा पश्चिम अथवा दातिवली येथे येते. त्यामुळे गोंधळ उडतो. अशाने काही नागरिक मतदान करायला घराच्या बाहेर पडत नाहीत.
- सचिन गावडे, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com