मालमत्ता कर २५ मे पूर्वी न भरल्यास दंडात्मक कारवाई

मालमत्ता कर २५ मे पूर्वी न भरल्यास दंडात्मक कारवाई

मालमत्ताकर २५ मेपर्यंत भरा;
अन्यथा दंडात्मक कारवाई

जप्त मालमत्तांच्या लिलावाचे पालिका आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत करभरणा न केल्यास मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, नोटीस बजावलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर महापालिका अधिनियमाच्या कलम २०५ नुसार जप्तीची कारवाई करण्यात यावी. त्यानंतरही वसुली न झाल्‍यास जप्‍त केलेल्या‍ मालमत्तांचा लिलाव करावा, असे निर्देश महापालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले. २०२३-२४ साठी मालमत्ता करवसुलीचे असलेले चार हजार ५०० कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्यासाठी १५ दिवसांत ५९५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्‍हान आहे.
जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला आहे. करवसुलीचे उद्दिष्‍ट गाठण्यासाठी पालिकेने मालमत्ता कराच्या संकलनावर भर दिला आहे. मालमत्ता कराची देयके फेब्रुवारीत पाठवण्यात आली आहेत. ही देयके भरण्यासाठी २५ मेपर्यंत मुदत पालिकेने दिली आहे. या मुदतीत कर न भरणाऱ्या, विशेषतः मोठ्या मालमत्ताधारकांवर दंडात्मक आणि जप्तीची कारवाई केली जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी पालिका मुख्‍यालयात करवसुलीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मालमत्ता करवसुलीबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच करवाढीचा नवीन स्रोत शोधण्यासाठी २४ विभागांतील मालमत्तांचे स्‍थळनिरीक्षण करून त्‍यातील बदलानुसार करनिर्धारणात सुधारणा करावी, असे निर्देशही आयुक्‍तांनी दिले आहेत.
------------------
२०२३-२४ मधील करवसुली
निर्धारित उद्दिष्‍ट : ४,५०० कोटी
प्रत्यक्ष वसुली : ३,९०५ कोटी (९ मेपर्यंत)
------
तीन मालमत्तांवर जप्ती
पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन थकबाकीदारांच्या मालमत्तांवर पालिकेने जप्तीची कारवाई केली आहे. पी उत्तर विभागात कुरार गावातील मालाड येथील एसजीएफ एंटरप्रायजेस (तीन कोटी ११ लाख ५८ हजार ९८९ रुपये), मालाड येथील राणी सती मार्ग येथील राधा कन्‍स्‍ट्रक्‍शन प्रा. लि. (दोन कोटी ५४ लाख ०५ हजार ७३७ रुपये) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एफ उत्तर विभागातील वडाळा येथील कपूर मोटर्स यांच्या व्यावसायिक भूखंडावर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्‍यांच्‍याकडे एक कोटी सात लाख ५६ हजार २०५ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांत करभरणा न केल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com