अक्षय तृतीयेला अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी

अक्षय तृतीयेला अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी

मुहूर्ताच्या सोने खरेदीला बहर

उलाढाल ४० टक्के वाढल्याचा अंदाज

मुंबई, ता. १० : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सराफा पेढ्यांवर झुंबड उडाली होती. दागिन्यांपेक्षा नाणी, वळे, बार, बिस्कीट खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा (२४ कॅरेट) भाव ७२ हजार रुपये होता. सोन्याचा भाव आवाक्याबाहेर जाऊनही नागरिकांमध्ये मुहूर्ताच्या खरेदीचा उत्साह दिसून आला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढालीत ४० टक्के वाढ झाल्याचा अंदाज सराफा व्‍यावसायिकांनी वर्तवला.
पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ म्हणाले की, सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिक सोने खरेदीकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीयांनी दागिन्यांपेक्षा नाणी, वळे या स्वरूपात सोनेखरेदीला पसंती दिली.
आज सकाळपासूनच सोने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. मागील वर्षीपेक्षा सोन्याचे भाव या वर्षी वाढले आहेत. किमतीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास या वर्षी उलाढाल ४० टक्के वाढली आहे, तर वजनाच्या परिमाणात सोन्याची उलाढाल दहा टक्के अधिक झाली, असे त्यांनी सांगितले. भाववाढ होऊनही ग्राहकांनी मोठे दागिने, नेकलेस, बांगड्या, हिरे यांची मोठी खरेदी केली. त्याबरोबर नाणी, वळे, बार, बिस्कीट यांसारख्या चोख सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह होता. ज्यांना दागिने परवडत नव्‍हते, त्यांनी चोख सोने खरेदी केले. त्यासाठी वेगळी व्‍यवस्था करण्यात आली होती, असेही गाडगीळ म्हणाले. सोन्यातील गुंतवणुकीत लोकांचा विश्वास कायम आहे. शेअर किंवा म्युच्युअल फंड याप्रमाणेच सोन्यातही गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. एसआयपीप्रमाणे मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची सवय ग्राहकांत रुजत असल्याकडे गाडगीळ यांनी लक्ष वेधले.
------
वर्षभरात भाव एक लाखांवर जाणार
आज १० ग्रॅम सोन्याचा (२४ कॅरेट) भाव ७२ हजार रुपये होता. सध्या जगभरात युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अस्थिरता यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती मिळत आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. एकूणच परिस्थिती पाहता वर्षभरात सोन्याचा भाव एक लाखावर गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, असा अंदाज गाडगीळ यांनी वर्तवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com