ठाणे पान दोन पट्टा

ठाणे पान दोन पट्टा

विशेष सत्संगामध्ये डोंबिवलीकरांचा सहभाग
कल्याण (वार्ताहर) : बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ ‘समर्पण दिवस’ समारोहाचे आयोजन सोमवारी (ता. १३) सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाना) येथे सद्‌गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सान्निध्यात करण्यात येणार आहे. समर्पण दिवसाच्या निमित्ताने स्थानिकस्तरावर एकूण ४० ठिकाणी विशेष सत्संग समारोह आयोजित केला जाणार आहे. यामध्ये मुंबई व डोंबिवली परिसरातील समस्त निरंकारी भक्तगण सहभागी होणार आहेत. बाबा हरदेवसिंहजी यांनी आध्यात्मिक जागरुकतेबरोबरच सामाजिक कार्यांत योगदान दिले आहे. बाबा हरदेवसिंहजी यांनी ३६ वर्षे निरंकारी मिशनची धुरा सांभाळली.
............................
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (ता. १०) महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव यांनी पालिका मुख्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक आयुक्त निवेदिता पाटील, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, इतर अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक समाजबांधव व नागरिकांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले.
.................
प्रेरणा विशेची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
किन्हवली (बातमीदार) : श्रीलंका येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी किन्हवलीच्या अरविंद भानुशाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सुभाष विशे हिची निवड झाली आहे. प्रेरणा विशे ही तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून कराटे या क्रीडा प्रकारात तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. रविवारी (ता. १२) श्रीलंकेत फुमोणकाई आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विविध देशांतील सुमारे तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे अध्यक्षपद जपानचे मास्टर स्युकान हातोरी भूषविणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतातील निवड प्रक्रियेतून अरविंद भानुशाली महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सुभाष विशे हिची निवड झाली आहे. याबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली, उपाध्यक्ष खंडू विशे, सचिव दत्तात्रय करण, सहसचिव चंद्रकात धानके, खजिनदार डॉ. सुनील भानुशाली, संचालक रवि वेखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव धनवटे, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी प्रेरणाचे अभिनंदन केले.
....................
श्री सिद्धिविनायक वर्धापन दिन सोहळा
ठाणे (बातमीदार) : शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिराचा ३२वा वर्धापन दिन सोहळा शनिवार (ता. ११) ते सोमवार (ता. १३) या कालावधीत साजरा होणार आहे. गृहनिर्माण संकुलातील रहिवाशांच्या इच्छेनुसार, सुयश कला क्रीडा मंडळाने श्री सिद्धिविनायक मंदिराची १९९२ मध्ये स्थापना केली. मंडळाच्या माध्यमातून अनेक अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना मदत करण्यात येते. तसेच चित्रकला, भारतीय कला, पाककला, क्रिकेट आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. योग सत्रे, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शाळेच्या सुट्यांमध्ये लहान आणि तरुण मुलांमध्ये चांगल्या सवयी आणि संस्कृती रुजवण्यासाठी छोटे- छोटे कार्यक्रम होत असतात. तसेच मागील गेल्या २० वर्षांपासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com