निवडणुकीत बेरोजगारांचा भाव वधारला

निवडणुकीत बेरोजगारांचा भाव वधारला

उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची मेगा भरती
दुचाकीस्वार, खाद्यपदार्थ स्टॉलधारक तेजीत


राजीव डाके; सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ११ : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सर्वात मोठा उत्साह सुरू झाला आहे. १९ एप्रिलपासून सुरू झालेला हा उत्सव एकूण सात टप्प्यांत पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात ठाणे आणि मुंबईची निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे बळ लागत असल्याने त्यांची जमावाजमव सुरू झाली आहे. त्यामुळे जणू उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची मेगा भरतीच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जमवलेल्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारची रसद पुरवावी लागत असल्याने खाद्यपदार्थ स्टॉलधारक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहनचालकांचा भाव वधारला आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघांत यंदा अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असून निवडणुकीच्या रिंगणात ८० उमेदवार उतरलेले आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी कार्यकर्ता मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भाव वधारला असून रॅली, चौक सभा, रोड शो, मुख्य सभांसाठी गर्दी जमवण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच जिल्हाभरात तीनही मतदारसंघांत सहा हजारांहून जास्त बूथ संख्या असल्याने प्रत्येक बूथवर प्रत्येक उमेदवाराला बूथ प्रतिनिधी जमवणे कठीण होताना दिसत आहे. यात अपक्ष उमेदवारांना बूथ प्रतिनिधी मिळणे कठीण झाले आहे.

प्रति बूथ प्रतिनिधीचा भाव एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणाचा खर्च काही अपक्ष उमेदवारांना कठीण जाताना दिसत आहे. प्रमुख पक्षांतील उमेदवारांनी पक्षाच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या साखळीतून आधीच बूथ प्रतिनिधी निवडून ठेवले आहेत. त्यांच्याकडे प्रतिबूथ दोन प्रतिनिधींची व्यवस्था असल्याचे समजते; मात्र मोठ्या नेत्यांच्या होणाऱ्या सभांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमवणे, या उमेदवारांना फारच कठीण जाणार असल्याचे चित्र दिसते आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये नोंदणी
सभेत गर्दी होणे आवश्यक असल्याने मोठ्या पक्षातील उमेदवार आणि पक्षांकडून लोकांची जमवाजमव करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवल्याची माहिती मिळते आहे. लोकांना सभेसाठी आणण्याकरिता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. झोपडपट्ट्यांमधील बेरोजगार तरुण आणि कामाच्या शोधात नाक्यांवर आलेल्या कामगारांना उमेदवारांचे कार्यकर्ते लक्ष्य करताना दिसू लागले आहेत. एका सभेसाठी अशा कामगार आणि बेरोजगाराला ५०० ते ८०० रुपये ठरवण्यात येत असल्याचे समजते. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नजर टाकल्यास बहुतांश ठिकाणी पैसे घेऊन सभेला येणाऱ्यांची छुपी नोंदणी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे एरव्ही पानटपरी, नाक्यावर दिसणारा बेरोजगार तरुण आता उमेदवाराच्या अवतीभोवती दिसू लागला आहे. तर सामान्य जनतेतील काही लोक कोण उमेदवार किती पैसे देऊ शकतो, याचा कानोसा घेत असल्याच्या चर्चादेखील ऐकायला मिळत आहेत.

महिला बचत गटांना सुगीचे दिवस
ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात असलेल्या महिला बचत गटांनादेखील उमेदवाराकडून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांच्या खास कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाठीभेटी वाढवल्याचे पाहायला मिळते. कार्यकर्त्यांना लागणाऱ्या नाष्टा, जेवणाची व्यवस्था करावी लागत असल्याने कॅटरिंगवाले, खाद्यपदार्थ स्टॉलवाले, महिला बचत गट यांनाही चांगले दिवस आल्याचे दिसत आहे.

रॅलीसाठी दुचाकीस्वारांना मागणी
बहुतांश मोठ्या नेत्यांची सभा इव्हेंटप्रमाणे होत असल्याने अशा इव्हेंट करणाऱ्या कंपन्यांनाही सुगीचे दिवस आलेले आहेत. उमेदवाराचा सोशल ग्रुप हँडल करणाऱ्या सोशल ग्रुप बहाद्दरांनाही या निवडणुकीत चांगले काम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या रॅलीत मोटरसायकलस्वारांची मोठी मागणी होत असल्याने त्यांनाही अच्छे दिन आल्याचे दिसते आहे. शिवाय रिक्षाचालकांनाही उमेदवारांच्या प्रचाराची ऑडिओ क्लिप घेऊन गल्लीबोळात फिरण्याचे काम मिळू लागले आहे. पेट्रोलपंपांचाही धंदा वाढला आहे.


पैशांचा मोबदला घेऊन काम करणारा कार्यकर्ता ही जुनीच पद्धत आहे. त्यामध्ये मात्र आता वाढ झाल्याचे म्हणता येईल; परंतु हा प्रकार उघडकीस आणणे सोपे नाही; मात्र उमेदवाराच्या रॅली, चौकसभा, रोड शो, मुख्य सभा यावर पोलिस, महसूल, निवडणूक अधिकारी यांच्या पथकांची नजर आहे. या पथकाकडून त्या कार्यक्रमातील खुर्च्यांची संख्या, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोप्या, झेंडे, उपरणे, स्टेज, स्पीकर, मंडप आदी साहित्यांची नोंद करून घेतली जात आहे. उमेदवाराकडून पैसे घेऊन कार्यकर्ता काम करत असल्याचा पुरावा आढळून आल्यास तो संबंधित उमेदवाराच्या खर्चात दाखवता येऊ शकतो.
- मनोज सानप, जिल्हा माहिती तथा नोडल अधिकारी, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com