पालघरचे ‘मिशन लक्षवेध’

पालघरचे ‘मिशन लक्षवेध’

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यातील मुले ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक खेळात सहभाग घेता यावा, यासाठी ‘मिशन लक्षवेध’ या उपक्रमाखाली मुलांना सरावासाठी प्रोत्साहन दिले जात असून मुलींचा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा विभागाला आहे.

पालघर जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात खेळामध्ये टॅलेंट आहे. मात्र त्यांना खेळाचा उत्तम सराव करता यावा, त्यातून स्पर्धक तयार व्हावेत, म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘मिशन लक्षवेध’ या क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या उपक्रमाला सुरुवात केली. पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलात शेकडो मुले-मुली सरावासाठी रोज येत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल. त्यामुळे ग्रामीण भागात या उपक्रमाला व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.

खो-खो, हँडबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग, व्हॉलिबॉल या खेळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजनदेखील जिल्ह्यात करण्यात आले होते. याचबरोबर विविध उपक्रम राबवले जातात. एकीकडे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात असताना त्यांच्यामधील सुप्त कला-गुणांना वाव मिळावा, म्हणून ‘मिशन लक्षवेध’ या उपक्रमातून सरावाला प्राधान्य दिले जात आहे. खेळ खेळताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियम, प्रतिस्पर्ध्याला मात देणे यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळते. त्यामुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा सराव महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर जिल्ह्यातील खेळाडू ऑलिम्पिक खेळात जावेत, यासाठी सराव, तयारी, प्रशिक्षक यासाठी नियोजन केले जात आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी खेळाडू सहभाग घेतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

क्रीडा विभागाकडून सुविधा
दैनंदिन खेळाच्या सरावासाठी शेकडो मुले, मुली येत असतात. त्यामुळे त्यांना विविध सुविधादेखील पुरवल्या जात आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडा गणवेश, पौष्टिक आहार देण्यात येतो. तसेच सर्व करताना काळजी घेण्यात येत आहे.

कोणत्या खेळाचे प्रशिक्षण?
ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, फुटबॉल, शूटिंग, बॉक्सिंग, हॅन्डबॉल, बॅडमिंटन आदी खेळांच्या नियमित सरावासाठी पालघर जिल्ह्यातील खेळाडू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये येत आहेत. यात ॲथलेटिक्स, खो-खो, बॅडमिंटन व कबड्डी या खेळात जास्त खेळाडू सराव करताना दिसत आहेत.

मुलींचाही उत्साह
मुली प्रत्येक क्षेत्रात आपली उत्तम कामगिरी बजावत आहेत. अनेक खेळांत स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. पालघर जिल्ह्यातील मुलीही अव्वल असून, अधिकाधिक सराव करता यावा, यासाठी मुलींची संख्यादेखील कमालीची असल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यातील ११३ मुली नित्यनियमाने सरावासाठी येत आहेत.

पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रावर नियमित दहा खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. दरदिवशी तीनशे ते साडेतीनशे मुले-मुली नियमित सरावाला येतात. जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही मदत करत आहेत. पालघरमधून ऑलिम्पिक खेळाडू घडवणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.
- सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी

सराव करणाऱ्यांची संख्या
मुली ११३
मुले १५६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com