ऐरोलीचा मतदार राजा कोणाला पावणार

ऐरोलीचा मतदार राजा कोणाला पावणार

कानोसा
ऐरोली
सुजित गायकवाड

ऐरोलीचा मतदार राजा कोणाला पावणार?
शिवसेना-राष्ट्रवादीचा गड सर होईल का?
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ऐरोलीकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून सलग दोन वेळा माजी आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून गेले आहेत. त्या काळात संदीप नाईक यांनी थेट शिवसेना-भाजपला लढत दिली होती. गेल्या २०१९च्या निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाजपमधून विक्रमी मतांनी विजय झाला; परंतु तीन वेळा या मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना असल्यामुळे यंदा ऐरोली मतदारसंघातील मतदारांचा कल सत्ताधाऱ्यांच्या दिशेने आहे की प्रादेशिक पक्षांच्या उमेदवाराकडे जातो, हे प्रचारानंतर स्पष्ट होईल.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघापैकी ऐरोली हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. आमदार गणेश नाईक हे यांचा या मतदारसंघात वास्तव्य आहे. नाईकांच्या बालेकिल्ल्यापैकी ऐरोली मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. ऐरोली मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या रचनेचा असल्यामुळे या भागात बेलापूरच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्या आणि गावठाण भागाचा समावेश होतो. तसेच हा मतदारसंघ सिडकोतर्फे नवी मुंबई महापालिकेकडे उशिराने आल्यामुळे बऱ्याच भागात विकासकामे रखडल्याचे चित्र आहे. तर मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणे उभी आहेत. या मतदारसंघात सिडको, महापालिका, एमआयडीसी, वनविभाग आणि जिल्हाधिकारी अशा सर्वच यंत्रणांच्या जमिनी असल्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना या सर्व यंत्रणांच्या संबंधित प्रश्नांशी झगडावे लागत आहे. नाईक कुटुंबीय याच मतदारसंघात असल्यामुळे त्यांचा दबदबा मतदारसंघात जास्त होता. दरम्यानच्या काळात नाईकांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जवळचे समर्थक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांमध्ये विभागले गेले. कालांतराने ऐरोलीतील नाईकांच्या पूर्वीचे समर्थकांची आता काहीशी चांगली ताकद वाढली आहे. दिघा अनधिकृत बांधकाम असोत अथवा गावठाणातील बांधकामे असो, प्रत्येकवेळी माजी नगरसेवकांना त्याचा आधार वाटत असल्याने ऐरोलीतील राजकारण नाईकांच्या नावाभोवतीच फिरते. सध्या मित्र पक्षात एकत्र असणारे कधीकाळी एकमेकांसमोर आव्हान देणारे परस्परविरोधक नेते ऐरोलीत सध्या प्रचार करतानाचे दृश्य दिसत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढणारे संदीप नाईक यांना शिवसेना-भाजप युतीचे त्यावेळचे उमेदवार विजय चौगुले यांनी आव्हान दिले होते. २०१४ आणि २००९ या दोन्ही वेळच्या निवडणुकीत संदीप नाईक यांना चौगुले यांनी कडवी झुंज दिली होती. त्यावेळेस मनसे आणि इतर प्रादेशिक पक्ष वेगवेगळे लढले होते; परंतु चौगुलेंनी नगरसवेकपदाची निवडणूक सोडली. इतर निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नाही. सध्या ऐरोलीतही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक हातपाय मारताना दिसतात; परंतु महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे तसे नवीन असल्याने मतदारांवर अद्याप त्यांचा प्रभाव नाही; परंतु त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे विजय चौगुले, भाजपचे आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे वलय मोठे असल्याने हे आव्हान सोपे होणार आहे. मात्र, विद्यमान खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या कारकिर्दीत ऐरोलीतील ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांचे प्रश्न, इलठाणपाडा धरणाचा प्रश्न आदी काही समस्यांना हात घातल्याने ते येथील मतदारांच्या परिचित आहेत.
------------------------------------
परप्रांतीयांची मते कोणाकडे?
ऐरोली मतदारसंघात दिघा, रबाळे, इलठाणपाडा, डॉ. आंबेडकरनगर, घणसोली, नोसीलनाका, ऐरोली आणि एमआयडीसी येथील झोपडपट्टीबहुल भागात उत्तर भारतीय, बिहारी आणि इतर विविध प्रांतातील मतदार राहतात. या भागातील नगरसेवक वेगवेगळ्या पक्षातील आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील या मताधिक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

--------------------------------------
दलित मतांची टक्केवारी अधिक
ऐरोली मतदारसंघात ओबीसींबरोबरच दलित मतांची टक्केवारी अधिक आहे. या मतदारसंघात दलित मतदारांना प्रतिनिधित्व करणारे काही नगरसेवक महापालिकेत आहेत. या समाजाच्या अनेक मागण्या आणि समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडून येण्याकरिता हा घटक महत्त्वाचा असल्‍याने ज्याच्या पारड्यात ही मते पडतील, त्याचा विजयाचा मार्ग सोपा होणार आहे.
----------------------------------------
ऐरोली विधानसभा मतदारसंघ - २०१९
भाजप - १,१४,६४५ - ५८%
राष्ट्रवादी काँग्रेस - ३६,१५४ - १८%
मनसे - २२,८१८ - ११%
....................
२०१४
राष्ट्रवादी काँग्रेस - ७६,४४४
शिवसेना - ६७,६१९
......................
२००९
राष्ट्रवादी काँग्रेस - ७९,०७५
शिवसेना - ६७,११८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com