आज प्रचार ‘तळपणार’

आज प्रचार ‘तळपणार’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते आता मतदानापर्यंतच्या कालावधीत उमेदवारांना प्रचारासाठी आजचा एकमेव रविवार मिळाला आहे. त्यामुळे हा रविवार सार्थकी लावण्याचे नियोजन सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केले आहे. हक्काच्या सुटीमुळे चाकरमानी घरी असणार हे गृहीत धरून अनेकांनी सकाळच्या सत्रात भव्य मिरवणुका काढत घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी देण्यावर भर दिला आहे. तर सायंकाळी भव्य सभांपासून ते कॉर्नर सभांपर्यंतचे नियोजन केले आहे. यामध्ये एकीकडे कल्याण पश्चिम आणि शहापूर येथे शरद पवार यांची सभा होणार आहे. तर राज ठाकरे यांची कळव्यामध्ये सभा होणार आहे. त्यामुळे एकंदरीत रविवारी प्रचार तळपणार आहे.

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली असून त्याची सांगता २० मे रोजी मतदानाने होणार आहे. या उत्सवाचा पारा ठाणे जिल्ह्यातही चढला असून उमेदवारांपासून ते कार्यकत्यांपर्यंत उत्साह शिगेला पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. ठाणे लोकसभेत महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत आहे. कल्याणमध्ये महायुतीचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर तर भिवंडीत महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत आहे. प्रमुख आघाडी, युतीसह या तिन्ही मतदारसंघांमध्ये एकूण ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी ४५ अपक्ष व छोट्या पक्षाचे उमेदवार शिलाई मशीन, पंखा, नारळ इत्यादी चिन्ह घेऊन मैदानात आहेत. तर १३ रणरागिणीही पदर खोचून आव्हान देण्यास सज्ज आहेत.

वास्तविक प्रचारासाठी रविवार हा हक्काचा दिवस मानला जातो. या दिवशी नोकरदारवर्ग घरीच असल्याने उमेदवारांना त्यांची प्रत्यक्ष भेट घेणे सोपे होते; पण यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदानाच्या कालावधीत आजचा एकमेव रविवार उमेदवारांच्या वाट्याला आहे. आजच्या रविवारनंतर एकही शासकीय सुटी नाही. तर मतदानाच्या आधीच्या रविवारपर्यंत प्रचाराची कालमर्यादा संपत आहे. त्यामुळे हाती आलेल्या या एकमेव रविवारचा सदुपयोग करून प्रचाराचा धडका वाढवण्याचे नियोजन अनेकांनी केले असल्याचे दिसते. उमेदवारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रात धावती प्रचार रॅली काढून जास्तीत जास्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. यादरम्यान चौक सभा घेत घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावरही भर असणार आहे. सायंकाळच्या सत्रात प्रचार आणखी वेगवान करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे कळते. ज्या भागातून कमी मतदान होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी दिग्गज नेत्यांना आणून मतदारांची मने वळवण्याचा प्रयत्न काही उमेदवार करणार आहेत.

भिवंडीच्या शिलेदारासाठी शरद पवार मैदानात
भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून घेत शरद पवार यांनी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार कपिल पाटील यांना आव्हान ते देत आहेत. सोबत अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे हेसुद्धा मैदानात आहेत. अशावेळी बाळ्या मामा यांना बळ देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. शहापूरला आज त्यांची दुपारी चार वाजता सभा होणार आहे. वासिंद येथाील निसर्ग हॉटेलच्या समोर होणाऱ्या या सभेला महाविकास आघाडीतील खासदार संजय राऊत, काँग्रेसचे राज्य अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत. शहापूरमध्ये पवार यांची पहिलीच सभा असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. त्यानंतर ते कल्याण पश्चिम मॅक्सी ग्राऊंड येथे सायंकाळी सात वाजता सभा घेणार आहेत.

राज ठाकरे आनंदाश्रमात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात येणार आहेत. यावेळी ते अनेक वर्षांनंतर आनंदाश्रमला भेट देणार आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेना शिंदे गटासह मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे; पण त्यानंतर मात्र ठाकरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कळव्यातील नायंटी फिट रोडवर सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे. गेल्यावेळी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यामुळे आव्हाडांच्या गडात ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com