प्रचाराचा ट्रेंड बदलला

प्रचाराचा ट्रेंड बदलला

अमोल सांबरे : सकाळ वृत्तसेवा
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : ग्रामीण भागात निवडणुकीचा प्रचार म्हटला की, तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फाेटो, जाहिरनामे आणि रिक्षाला भोंगा लावून गगनभेदी घोषणा असे चित्र उभारते. पण, या आधुनिक काळात हे सर्व बदले आहे. प्रचार ही हायटेक झाला आहे. समाज माध्यमाचा वापर वाढला आहे व पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वत्र रणधुमाळीन पाहायला मिळत आहे. आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर सर्वाधिक भर दिला जात आहे.
पूर्वीच्या गगनभेदी घोषणा आता लुप्त झाल्या असून भोंग्यांचा कर्कश आवाज, गाणी, घोषणा यांनी जागा घेत आवाजाचा गोंधळ माजवला आहे. इतर निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा कार्यक्षेत्र आकारमानाने मोठे असल्याने प्रचार करणारे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स ॲप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला आणि तत्काळ व जलद गतीच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणांनी जागा घेतली; पण सर्व उमेदवारांचा भर ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर देणारा ठरत आहे. प्रचाराची अवधी कमी दिवसांचा मिळत असल्याने पूर्वीसारखी दीर्घ रंगत आता पाहायला मिळत नाही. होर्डिंग, फ्लेक्स, कटआऊटने जागा व्यापून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वी उमेदवारांच्या विश्वासू, निष्ठावान कार्यकर्त्यांची एक फळीच असायची. ते निष्ठेने कार्य करायचे. त्यांची सर्व व्यवस्था लावल्याशिवाय ते हलतच नसल्याचे पाहायला मिळते.
लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष हायटेक ऑनलाईन प्रचाराला पसंती देताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉटस्अप याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निवडणुकीतून दिसून येत आहे. कमी वेळेत अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रचार लाभदायक ठरतो, हे जाणून भाजप, ठाकरे गट, उमेदवार, बविआ व अपक्ष उभे राहिलेले उमेदवार हे पुरेपूर वापर करत आहेत.

मतयाचनेसाठी समाज माध्यमांवर ग्रुप
पालघर लोकसभा मतदारसंघात ७० ते ८० टक्के मतदार हे फेसबुक, व्हॉट्स ॲप या समाज माध्यमांचा वापर करतात. या वेळच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदार आहेत. अनेक मतदार हे नवतरुण असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी समाज माध्यमांवर काही कार्यकर्त्यांनी ग्रुप बनवले आहेत. याशिवाय, एसएमएस, व्हॉईसमेलच्या माध्यमातून प्रचारावर भर देण्यात आला. आपल्या उमेदवाराची माहिती देऊन मतयाचना केली जात आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्वच पक्षांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे.

प्रचार साहित्य छापण्यात चढाओढ
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही निवडणुकांमध्ये फ्लेक्स, बॅनर, पत्रके, पोस्टर आदी प्रचार साहित्य छापण्यासाठी चढाओढ होताना दिसत आहे. प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली जात आहे. भरमसाठ आश्वासनांची खैरात, वैयक्तिक निंदा आणि एकमेकांचा भ्रष्टाचार प्रसिद्धीवर जोर देण्याचा प्रयत्नही दिसून येतो.

भ्रष्टाचार, विकासचा मुद्दा केंद्रस्थानी
विशेष म्हणजे, या निवडणुकीत सर्वच उमेदवार भ्रष्टाचारावर अधिक बोलू लागले आहे. मुख्य मुद्दा ‘भ्रष्टाचार’ आणि ग्रामीण भागाचा विकास हाच केंद्रस्थानी ठरत आहे. शहर विकासाचा मुद्दा दुसऱ्या स्थानावर जात असल्याचे जाणवत आहे. वचननामा, जाहीरनामा, पत्रकातील मजकूर असे मुद्दे अजून तरी ग्रामीण भागातील मतदारांपुढे पोहचलेले दिसत नाहीत. ग्रामीण भागातील रस्ते, सुंदर शहर, पाणी पुरवठा, बाजारपेठा, स्वच्छतेचा प्रश्न, प्रसाधन गृह आदी प्रश्न शहराला व ग्रामीण भेडसावत आहे; पण यावर चर्चा होत नसल्याचेही दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com