ई-टॉयलेटची योजना बारगळली

ई-टॉयलेटची योजना बारगळली

ई-टॉयलेटची योजना बारगळली
अस्वच्छता, पाण्याचा अभाव; दिवे बंद
वाशी, ता. १२ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावर मोठा गवगवा करत नवी मुंबई महापालिकेने ई-टॉयलेट उभारले आहे. या ई-टॉयलेटला अवघ्या पाच वर्षांत उतरती कळा लागली आहे. देखभालीकडे दुर्लक्ष झाल्‍याने टॉयलेटमध्ये अस्‍वच्छता आहे. पाण्याचा अभाव तसेच आतमधील दिवे बंद असल्‍याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
ई-टॉयलेट हटवून त्या ठिकाणी पालिकेकडून विटांच्या भिंतीचे शौचालय बांधण्यात येणार असल्याचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले होते, पण आजतागायत या ठिकाणी भिंतीचे टॉयलेट बांधण्यात आलेले नाही. सद्यःस्थितीत असलेल्‍या टॉयलेटमधील अस्‍वच्छतेमुळे रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने पाच वर्षांपूर्वी ठाणे-बेलापूर मार्गावर महापे येथील ई टॉयलेटचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्‌घाटन केले होते. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावर नऊ ठिकाणी लाखो रुपये खर्चून ई-टॉयलेट उभारले आहेत. पावणे उड्डाणपूल, महापे स्कॉयवॉकजवळ, एमआयडीसी कार्यालयानजीक, रिलायन्स कंपनीजवळ, तळवली नाका, रबाले पोलिस ठाणेनजीक, सिमेन्स कंपनी व उरण जंक्शन या ठिकाणी ई-टॉयलेट बसवण्यात आले आहेत. या ई-टॉयलेटमधून सुरुवातीच्या काळात एक रुपया, दोन रुपये किंवा पाच रुपयांची नाणी टाकून नागरिकांना वापर करता येत होता. मात्र, टॉयलेटच्या कॉईन बॉक्समधील पैसे चोरीला जात असल्याने हे सर्वच ई-टॉयलेट नागरिकांसाठी विनामूल्‍ खुले करण्यात आले. मात्र, स्‍वच्छता तसेच पाण्याअभावी या टॉयलेटचा वापर होत नाही. त्यामुळे पालिकेने हे ई-टॉयलेट हटवून त्या ठिकाणी नवीन टॉयलेट उभारण्याचे ठरवले होते. यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्याशी संपर्क साधला असता विटांच्या भिंतींचे शौचालय उभारण्याचे काम हे अंभियता विभागाचे असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले. शहर अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

चौकट
ई-टॉयलेट बनला तृतीयपंथींचा अड्डा
महापे, घणसोली, तळवली या रस्त्यावर रात्रीच्यावेळी तृतीयपंथींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. रात्री उशिरा पोलिस या ठिकाणच्या तृतीयपंथींवर कारवाई करतात. मात्र पोलिस आल्यानंतर आणि रात्री उशिरा या ई-टॉयलेटमध्ये लपण्याचादेखील प्रकार तृतीयपंथींकडून होतो. अनेक वस्तूदेखील या ई-टॉयलेटमध्ये लपवल्या जातात. त्‍यामुळे हे ई-टॉयलेट तृतीयपंथींचा अड्डा बनले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com